गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलाचे काम आयआयटीच्या मान्यतेनंतरच

गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलाचे काम आयआयटीच्या मान्यतेनंतरच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः बिहार राज्यातील दुर्घटनाग्रस्त पुलाचे काम ज्या कंत्राटदाराने केले होते त्यालाच मुंबईतील गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे. मात्र, संबंधित पुलाचे काम मुंबई आयआयटीच्या मान्यतेनंतरच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या वा कोणाच्या मागणीवरून निर्णय घेता येणार नाही. बिहार पूल दुर्घटनेबाबतच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

गोरेगावमधील प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल आणि मुलुंड खिंडीपाडा उन्नत मार्गाचे कंत्राट एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीला देण्यात आले आहे. त्याच कंत्राटदारातर्फे बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात गंगा नदीवर उभारला जाणारा पूल नुकताच कोसळला. त्यामुळे गोरेगाव व मुलुंडमधील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम त्या कंपनीला देऊ नये. ते कंत्राट रद्द करण्यात यावे आणि कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले आहे. मात्र, कोणाची मागणी वा वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांवरून कुठलाही निर्णय घेणे शक्य नाही. बिहार राज्यातील पूल दुर्घटनेचा अहवाल आल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात येईल. गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलाचे काम आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानंतर व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी बांधकाम योग्य होत असल्याचे निरीक्षण नोंदवल्यानंतरच सुरू करण्यात आले आहे, असे चहल यांनी स्पष्ट केले.

गोरेगाव-मुलुंड उड्डाणपूल बांधण्याचे काम आयआयटी मुंबई व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी दिलेल्या अहवालानुसार सुरू आहे. सध्या दिंडोशी कोर्ट परिसरात कामास सुरुवात करण्यात आली आहे.
--
सक्षम कंपनीला काम देण्याची भाजपची मागणी
उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला आणि मुंबई महापालिकेला लुटण्याचे काम केले. ‘कॅग’च्या अहवालात तेच आहे. बिहारचा पडलेला पूल ज्या कंपनीने बनवला तिला गोरेगाव-मुलुंड टनेलचे काम दिले आहे. कामाची पुन्हा पाहणी करून सक्षम कंपनीलाच ते द्यावे, अशी मागणी मी पालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे, असे भाजप प्रवक्ते राम कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com