
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी ‘वसुंधरेचे शिलेदार'' एक अनमोल ठेवा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ‘वसुंधरेचे शिलेदार’ हे केवळ एक पुस्तक नसून पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक अनमोल ठेवा असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार मनीष वाघ लिखित ‘वसुंधरेचे शिलेदार’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त ते बोलत होते. यावेळी प्राणीशास्त्रतज्ज्ञ डॉ. संजय जोशी, पर्यावरण कार्यकर्ता रोहित जोशी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यकर्ता हा प्रत्येक माणसात असतो. फक्त सजग होऊन समाजातल्या प्रत्येक घटनेकडे बघण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ‘वसुंधरेचे शिलेदार'' अशाच सामान्य कार्यकर्त्यांची पण असामान्य कार्य करणाऱ्या ३६ माणसांची कथा असून मनीष वाघ यांनी अशी आता लेखणीचे शिलेदार बनून असे अनेक कार्यकर्ते समाजासमोर आणावेत, असेही डॉ. टेकाळे यांनी सांगितले. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. संजय जोशी यांनी सांगितले, निसर्गातील जैवविविधतेमध्ये असलेला समन्वय साधणारा माणूस हा वसुंधरेचाच एक भाग आहे. यातला एखादा घटकही वरखाली झाला, म्हणजे निसर्गाचे रौद्ररूप काय असते, ते आपण सध्या अनुभवत आहोत; परंतु ‘वसुंधरेचे शिलेदार'' मात्र या सगळ्या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यामागची कारणे कारणे शोधतात आणि कृती करतात. या पुस्तकातून अशाच शिलेदारांचा परिचय लेखकाने करून दिला आहे.
रोहित जोशी यांनी ठाण्याची खाडी, अशास्त्रीय पद्धतीने होणारी वृक्षतोड याविषयावर आपले मत व्यक्त केले. समाजात घडणाऱ्या अनेक लहान-मोठ्या समस्येवर वारंवार आवाज उठवला, तरच प्रशासकीय यंत्रणा जाग्या होतात, असे सांगितले. असे अनेक कार्यकर्ते निर्माण करण्याची प्रेरणा ‘वसुंधरेचे शिलेदार'' या पुस्तकातून मिळेल, असेही जोशी यांनी सांगितले.
बाळ कांदळकर यांनी आपल्या मनोगतात मनीष वाघ यांच्या लेखन प्रवासाचा आढावा घेतला. केवळ पर्यावरणच नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा परिचयही मनीष वाघ यांनी करून द्यावा. मराठी भाषेत अशी पुस्तके निर्माण व्हावीत, असेही त्यांनी सांगितले.