कालव्यावरील पूल धोकादायक

कालव्यावरील पूल धोकादायक

कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा-सायवन रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील सूर्या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील पूल धोकादायक स्थितीत आहे. येथे पूल कोसळून दुर्घटना होऊ शकते. या पुलाच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सूर्या प्रकल्पातील धामणी आणि कवडास धरणातील पाणी कालव्यांतून शेतीसाठी पुरवले जाते. ३५ ते ४० वर्षांपूर्वी हे कालवे बांधलेले असून वाघाडी गावाजवळ कासा-सायवन राज्यमार्ग गेला आहे. या उजव्या कालव्यावर पूल बांधला असून तो आता जीर्ण झाला आहे. पुलाखालील भागातील लोखंडी सळ्या गंजल्या असून तो कधीही पडू शकतो. या पुलावरून वापी, सिल्व्हासा येथील कारखान्यातून मुंबई, ठाणे, नाशिककडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांतून माल वाहतूक होते.

कासा-सायवन भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरील हा पूल जीर्णावस्थेत असून अवजड वाहनांमुळे कधीही अपघात घडू शकतो. या कालव्यात पुलाखाली लहान मुले उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेतात, तर गावातील महिला कपडे धुतात. कालव्यावरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडेसुद्धा तुटले असून खालील भागात गंज लागून काही भागाची पडझड झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या धोकादायक पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाघाडी गावातील नागरिक करत आहेत.

वाघाडी गावातील पुलावरून अवजड वाहने ये-जा करत असतात. या कालव्यावरील पूल खालच्या बाजूने गंजला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊन मनुष्यहानी होऊ शकते. या पुलाची प्रशासनाने दखल घेत दुरुस्ती करावी.
- योगेश धापशी, सदस्य, वाघाडी ग्रामपंचायत


कासा-सायवन-शेलवास रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलाची आयुष्य मर्यादा संपली असून तो नवीन बांधावा, अशी मागणी बांधकाम विभाग, पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
- प्रशांत सातवी, सरपंच, वाघाडी

कालव्यावरील पुलाच्या बांधकामासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या पुलाप्रमाणे डहाणू, चारोटी येथील कालव्यावरील तीन पूल धोकादायक आहेत. त्यांचे बांधकाम दिवाळीनंतर सुरू होणार आहे.
- प्रवीण भुसारे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, धामणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com