
पालघर लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा
विरार, ता. ७ (बातमीदार) : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये मिळालेल्या यशानंतर काँग्रेसही महाराष्ट्रात निवडणुकीची गणिते जुळवू लागली आहे. पक्षाने त्या दृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. टिळक भवन येथील पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी पालघर लोकसभेच्या जागेवर दावा केला असून त्याचबरोबर विधानसभाही लढवणार असल्याचा ठराव केला आहे. त्यातच विक्रमगड मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील भुसारा हे आमदार असताना काँग्रेसने दावा दाखल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाने लोकसभेबरोबर आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने वेगवेगळ्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत. महाविकास आघाडीतील मतभेद समोर येत असताना काँग्रेसकडून अनेक मतदारसंघांवर दावा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत काँग्रेस पक्ष लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देत आला होता; परंतु त्या बदल्यात काँग्रेसला बविआने काही मदत केली नसल्याचा सूर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात आहे. जिल्ह्यातील ६ पैकी ४ जागा लढविण्याचा निर्धार केला आहे. विधानसभेसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालघर, बोईसर, वसई आणि विक्रमगड मतदारसंघाचीही मागणी केली आहे. महाविकास आघाडीतील एकाच पक्षाने चार जागांवर दावा केल्याने काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा ठाकरे गटाची ताकद जास्त असताना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे अन्य पक्ष कसे बघतात आणि त्यावर काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बहुजन विकास आघाडीला धक्का
काँग्रेसने पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा दाखल केल्याने हा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस नेहमी बविआच्या मागे उभा राहिला आहे. पालघर लोकसभेबरोबरच विधानसभेतही काँग्रेस बविआला पाठिंबा देत होता. त्यामुळे जर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असेल, तर त्याचा फटका लोकसभेबरोबरच विधानसभेलाही बविआला बसणार असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.