
पनवेलच्या विभाजनाची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ७ ः वाढत्या लोकसंख्येसह होणाऱ्या शहरीकरणामुळे प्रशासनाच्या डोक्यावरचा ताण वाढला आहे. त्यामुळे नागरी सुविधांच्या विक्रेंद्रीकरणासाठी पनवेलचे ग्रामीण, तसेच शहरी असे विभाजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पनवेल तालुक्यासाठी भविष्यात दोन तहसीलदार कार्यालयांची निर्मिती होणार असून या प्रस्तावाला राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर याबाबतचे परिपत्रक निघणार असल्याची चर्चा प्रशासनात रंगू लागली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा तालुका असणारे पनवेल हे भविष्यातील एक मोठे महानगर होऊ पाहत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, विरार-अलिबाग मल्टिकॉरीडोर, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू अशा प्रकल्पांमुळे पनवेल हे दक्षिण नवी मुंबईतील सर्वात मोठे शहर ठरणार आहे. मुंबईला पर्याय म्हणून विकसित झालेल्या नवी मुंबईनंतर पनवेलमध्ये तिसरी महामुंबई होणार आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील विकासकामांचा प्रशासनावर पडणारा ताण लक्षात घेता पनवेल शहर आणि ग्रामीण असे दोन गटात वर्गीकरण केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पनवेल शहर आणि पनवेल ग्रामीण असा या तालुक्यांचा उल्लेख होण्याची शक्यता आहे.
------------------------------------------
अशी असेल विभागणी
काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार शहरी तालुक्यात पनवेल शहर, सिडको वसाहती आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ भागाचा समावेश आहे; तर पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांव्यतिरिक्त उर्वरित गावांचा भाग हा ग्रामीण तालुक्यात समावेश होणार आहे.
-------------------------
वाढत्या लोकसंख्येमुळे निर्णय
- तहसीलदार कार्यालयामार्फत निवडणूक नोंदणी, निवडणूक ओळखपत्र, रेशनिंग धान्य वाटप, शिधावाटप पत्रिका, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले, महसुली प्रमाणपत्र, जमिनींच्या नोंदणी, प्रकल्पांचे भूसंपादन, पुनर्वसन आदी महसुलाशी संबंधित कामे सुरू असतात. मात्र मागील काही वर्षांमध्ये या परिसरात कमालीची लोकसंख्या वाढ झाली आहे.
- पूर्वीच्या २०११ ला झालेल्या जनगणनेनुसार १४ लाख लोकसंख्येचा आकडा पनवेल महापालिका क्षेत्रापुरता लागू करण्यात आला आहे. मात्र, २०२३ नंतर २०२४ पर्यंत हा आकडा आता २४ लाखांच्या आसपास जाईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्याकरीता दोन तालुक्यांची तजवीज आहे.
ः-----------------------------------------------
गोंधळ वाढण्याची शक्यता
पनवेलमध्ये असणाऱ्या तहसीलदार कार्यालयातून ग्रामीण, शहरी आणि सिडको वसाहती असे सर्वच कामकाज पाहिले जाते. याच कार्यालयातून महसुली नोंदी, शाळकरी दाखले, निवडणूक ओळखपत्र व नोंदणीची कामे केली जातात. काही वर्षांपूर्वी पनवेल महापालिका झाल्यानंतर पनवेल शहर, सिडको वसाहत, महापालिकेत समावेश झालेल्या गावांमधील नागरिकांचा प्रशासकीय गोंधळ संपलेला नाही. सिडको, महापालिका, तहसीलदार अशा तीन प्राधिकरणांकडून पनवेलचा कारभार चालवला जात आहे. अशा परिस्थितीत आणखीन एक कार्यालय सुरू केल्यास नागरिकांचा गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे.
--------------------------------------------
पनवेल तालुक्याचा विचार केल्यास खारघरकडे एक टोक आहे; तर दुसरीकडे पेण तालुका जिथे संपतो तिथे खारपाडा खाडी पुलाजवळ एक टोक आहे. अशा परिस्थितीत एवढ्या दूरवरच्या ग्रामस्थांना महसुली कामांसाठी पनवेल तहसीलदार कार्यालयात येणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे पनवेल तहसीलदार कार्यालयाचे दोन विभाजन झाल्यास नागरिकांच्या सोयीचे ठरणार आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल विधानसभा मतदारसंघ