धाटाव एमआयडीसीत भीषण आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धाटाव एमआयडीसीत भीषण आग
धाटाव एमआयडीसीत भीषण आग

धाटाव एमआयडीसीत भीषण आग

sakal_logo
By

रोहा, ता. ७ (बातमीदार) ः खाद्य पदार्थांचे रंग तयार करणाऱ्या रोहाडाय केम या कंपनीतील गोडाऊनला आग लागल्याची घटना धाटाव एमआयडीसी परिसरात बुधवारी (ता. ७) दुपारी घडली. यात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीत साठा करून ठेवलेल्या कोळशाने उष्णतेमुळे पेट घेतल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

रोहा डाय केम ही खाद्य पदार्थांचे रंग तयार करणारी कंपनी धाटाव एमआयडीसीत आहे. कंपपीच्या गोडाऊनमध्ये चुकीच्या ठिकाणी कोळसा जमा करून ठेवला होता. उष्णतेमुळे या कोळशाने पेट घेतला. त्या शेजारील शेफर, सोडियम नायट्रेट, घातक रसायनांमुळे ही आग पसरत गेली. त्यामुळे रसायनाने भरलेल्या ड्रमचे स्फोट झाले. यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. प्रयाग हशा डोळकर (वय ३३) असे या कामगाराचे नाव आहे. त्याला उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या कंपनीलगत असलेल्या बेक केमिकल कंपनीला या आगीमुळे वायुप्रदूषणाचा फटका बसला. दक्षतेचा उपाय म्हणून तेथील कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी चार अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. दीपक नायट्रेड कंपनीचे सेफ्टी मॅनेजर शैलेंद्र तांडेल, सहकारी गौरव पाटील यांनी दीपक नायट्रेड कंपनीतील अग्निशमन वाहन, फायर फायटिंग टीम यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आंथिया कंपनीचे प्रकाश शेटे व अन्य कंपनीतील अधिकारी वर्गानेदेखील मेहनत घेतली. या वेळी केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, विनोद पाशीलकर, समीर शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची चौकशी केली.
---
कंपनीतील आगीची घटना दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. पावसाळी अधिवेशनात या घटनेविषयी आपण आवाज उठवणार आहोत.
- प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप