Cyclone Biparjoy : मुंबईसह कोकणात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ धडकणार, नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyclone Biparjoy
‘बिपरजॉय’मुळे मच्छीमारांत धास्ती

Cyclone Biparjoy : मुंबईसह कोकणात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ धडकणार, नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा!

डहाणू : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, मुंबईसह कोकणात पुढील पाच ते सहा दिवस ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसह मच्छीमारांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे डहाणू बंदरातील मच्छीमार आणि बागायतदार धास्तावले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील २४ तासांत ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. त्याच्या प्रभावामुळे ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मात्र हे चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले नसले तरी, समुद्रात आग्नेय दिशेला चक्रीय स्थिती आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन, आठ, नऊ आणि दहा जूनला तीव्र होणार आहे. त्याचा फटका कोकण, मुंबई, पालघर आणि गुजरात किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यामुळे डहाणू बंदरात असणाऱ्या मच्छीमारी बोटी जास्तीत जास्त किनाऱ्यावर आणून ठेवण्यात येत आहेत. सतत बंदरातील पाण्यात तरंगत राहणाऱ्या फायबरच्या मच्छीमारी बोटी वादळामुळे एकमेकींवर आदळून फुटू नयेत म्हणून त्यांना चोहोबाजूंनी मजबूत दोरखंडाने बांधून ठेवले जात आहे.

कोकणाला धोका नाही-

वादळाच्या स्थितीबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, समुद्रात तयार झालेली चक्राकार स्थिती, सध्या मुंबईपासून अकराशे किलोमीटरवर उत्तरेच्या दिशेने असेल, त्यामुळे कोकणाला फारसा धोका नाही. मात्र, वादळी वारे आणि पावसाच्या शक्यतेमुळे किनारपट्टी भागातील नागरिक आणि मच्छीमार धास्तावले आहेत.