
महिलांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे
भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : निर्जन ठिकाणी अथवा अंधाऱ्या परिसरात महिलांवर अत्याचार होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी मिरा-भाईंदरसह वसई-विरार महापालिकेला दिल्या आहेत.
मुंबईत शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण घडल्यानंतर निर्जनस्थळी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर २०१५ मध्ये राज्य सरकारने सर्व शहरांमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने मूलभूत सुविधा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर दोन्ही शहरांची मिळून समिती स्थापन झाली आहे. या समितीमध्ये पोलिस आयुक्तांसह महापालिका अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना व त्याची अंमलबजावणी याचा समितीच्या माध्यमातून वेळोवेळी आढावा घेतला जातो.
पोलिस मुख्यालयात या समितीची मंगळवारी (ता. ६) बैठक पार पडली. बैठकीला पोलिस आयुक्त मधुकर पांडे, मिरा-भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.
वेलंकनी किनारी सुरक्षा रक्षक
उत्तन परिसरातील वेलंकनी येथील समुद्रकिनारा गुन्ह्यांच्या दृष्टीने धोकादायक बनत असल्याचे पोलिसांचे मत आहे. त्याठिकाणी सायंकाळच्या वेळी अनेक मद्यपी बसलेले असतात, त्यांच्याकडून त्याठिकाणी फिरायला येणाऱ्यांना उपद्रव दिला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वेलंकनी समुद्रकिनारी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचनाही पोलिस आयुक्तांनी दिल्या.
सीसी टीव्ही कॅमेरे बसवणार
मिरा-भाईंदर शहरातील निर्जन अथवा अंधार असलेली एकंदर १९६ ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली आहेत. याठिकाणी विजेचे दिवे बसवण्याच्या, त्याचप्रमाणे शहरात ठिकठिकाणी आठशे उच्च रिझोल्युशनचे सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी महापालिकेला दिल्या. वसई-विरार महापालिका क्षेत्रात विविध उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत.
पोलिस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. सीसी टीव्ही बसवण्यासाठी निधीची कमतरता भासल्यास लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मूलभूत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या निधीसाठी प्रयत्न केले जातील.
- डॉ. संभाजी पानपट्टे,
अतिरिक्त आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका.