
दुबईत रंगला शिवराज्याभिषेक सोहळा
डोंबिवली, ता. ८ (बातमीदार) : दुर्गराज रायगडापासून ते जगातील कानाकोपऱ्यात यंदाचा ३५० वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यंदा बुर्ज खलिफा दुबई येथेदेखील दुबईतील शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा इमारतीच्या परिसरात मराठी बांधवांसाठी शिवजयंतीसारखे भव्य सामाजिक कार्य करणारे डोंबिवलीकर चंद्रशेखर जाधव यांनी त्यांच्या सहकारी व परिवारासोबत हा सोहळा साजरा केला. या प्रसंगी टूर्स व ट्रॅव्हल्सची नवीन संस्था स्थापन करून त्याचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून नवीन संस्थेची कागदपत्रे छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केली. या सहकाऱ्यांमध्ये चंद्रशेखर जाधव यांच्यासोबत संदीप शिंपी, संदीप पवार, प्रशांत शिंपी व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या सोबतच दुबई येथे १८ जून रोजी छत्रपती मराठा साम्राज्य याच्यातर्फेही शिवराज्याभिषेकदिन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.