वसई-विरारमध्ये आज पाणीसंकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारमध्ये आज पाणीसंकट
वसई-विरारमध्ये आज पाणीसंकट

वसई-विरारमध्ये आज पाणीसंकट

sakal_logo
By

वसई, ता. ८ (बातमीदार) : वसई, विरार शहरांत अनियमित, कमी दाबाने; तर सूर्या पाणीपुरवठा योजनेत बिघाडाचे संकट येत असते. त्यातच शहरात लोकसंख्येच्या मानाने पाण्याची तूट आहे. मान्सूनपूर्व कामांमुळे उद्या (ता. ९) चोवीस तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांवर पाणी संकटाचे सावट आले आहे.

वसई, विरार शहराची लोकसंख्या कमालीची वाढत आहे. महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरवल्या जातात, त्यातील महत्त्वाची पाण्याची गरज आहे. वसई, विरार महापालिका क्षेत्रासाठी सूर्या धामणी, उसगाव व पेल्हार धरणांतील २३० एमएलडी पाणी उपलब्ध होते. मात्र लोकसंख्येच्या मानाने ३७२ एमएलडी गरज असताना १४२ एमएलडी पाण्याची तूट निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी नळजोडणी अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यातच १५ जूनपासून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी वसई, विरार शहरांत येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. यापूर्वी मे अखेरीस पाणी येईल, असे स्पष्ट केले होते.

एमएमआरडीएने या योजनेचे काम पूर्ण केले असले तरी पाणी येण्यास विलंब लागत असल्याने नव्या जोडण्या मिळण्यास जुलै उजाडणार आहे. त्यातच नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाणीबाणी सुरू असताना सूर्या धरणात मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात येणार असल्याने शहरात २४ तास पाणीपुरवठा बंद व नंतर अनियमित, कमी दाबाने पाणी वितरित होणार आहे. एकीकडे गळती, पाण्याची तूट, नागरिकांची वणवण व पालिकेने आखलेल्या वेळापत्रकामुळे पाणी वितरणावर परिणाम होत असताना शहरातील जलसंकट वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

२४ तासांचे शटडाऊन
वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवन पम्पिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांटमधील पम्पिंगचे पावसाळ्यापूर्वी तांत्रिक देखभाल-दुरुस्ती, प्लांटमधील अन्य आवश्यक कामे, तसेच वीज विभागामार्फत मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या नऊ प्रभागांतील मुख्य जलवाहिनी आवश्यक दुरुस्ती केली जाणार असल्याने उद्या (ता. ९) सकाळी ९ ते शनिवारी (ता. १०) सकाळी ९ या कालावधीत सूर्या धरणाच्या जुन्या आणि नवीन अशा दोन्ही योजनेवर महापालिकेमार्फत शटडाऊन घेण्यात येणार आहे.

नागरिकांवर दुप्पट भार
शहरात काही दिवसांपासून अनेक भागांत पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर मागवावे लागतात. एकीकडे पाणीपट्टी कर आकारला जात असताना दुसरीकडे टँकरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून हा पैसा कोण देणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

सहकार्याचे आवाहन
सूर्या धरणातून होणारा पाणी पूर्णपणे बंद राहणार आहे. देखभाल, दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.