
एटीएम कार्ड चोरी करणार्यास अटक
अंधेरी, ता. ८ (बातमीदार) ः रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीचे पाकीट चोरून एटीएम कार्डद्वारे पैसे काढणाऱ्या आरोपीस आंबोली पोलिसांनी नुकतीच अटक केली. अफझल नझीर पठाण असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध घरफोडी आणि ड्रग्ज तस्करीच्या सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
२७ मे रोजी यातील तक्रारदार रस्त्यावरून जात होते. या वेळी त्यांना बँकेतून एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात त्यांच्या खात्यातून ९५ हजार रुपये काढण्यात आल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे पाकीट पाहिले असता त्यांचे पाकीट चोरी झाल्याचे दिसून आले. पाकिटामधील एटीएम कार्डद्वारे अज्ञात चोरट्याने एटीएम सेंटरमधून पैसे काढले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या पथकातील एपीआय अजय चव्हाण, योगेश नरळे, गोरखनाथ पवार, प्रदीप कुलट, सचिन साखरे, गणेश मेश्राम यांनी तपासाला सुरुवात केली होती. एटीएम सेंटरच्या सीसीटीव्ही फुटेजवरून अफझल पठाण याला त्याच्या अंधेरीतील गणेशनगर, कृष्णा चाळीतून पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी २५ हजाराची कॅश जप्त केली. अफजल हा रेकार्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांत त्याला इतर सहकाऱ्यांनी मदत केली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.