बेकायदा फेरीवाल्यांची घुसखोरी

बेकायदा फेरीवाल्यांची घुसखोरी

खारघर, ता. ८ (बातमीदार) : खारघर परिसरात रस्ते तसेच पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून दैनिक बाजारच्या नावाखाली पालिका पन्नास रुपये घेत आहे. तसेच या फेरीवाल्यांना पालिकेकडून अधिकृत पावती दिली जात असल्यामुळे खारघर परिसरात बेकायदा फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
पनवेल महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी खारघर वसाहतीत बँक ऑफ इंडियाकडून शिव मंदिर आणि नवरंग सर्कलकडून गोखले शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पथविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ते आणि पदपथ व्यापले गेले होते. यावेळी खारघरमधील राजकीय पक्षांनी सिडकोच्या विरोधात आंदोलन करून फेरीवाल्यांसाठी भूखंड देण्याची मागणी केली होती. दरम्यान, सिडकोने तत्काळ खारघर परिसरात फेरीवाला क्षेत्र धोरण आखून भूखंड उपलब्ध करून दिले. नेहमी वर्दळ असलेला बँक ऑफ इंडियाकडून शिवमंदिराकडे जाणारा रस्ता फेरीवालामुक्त झाल्याने खारघरवासीयांनी भाजपने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले. दरम्यान, तत्कालीन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रस्ते, पदपथ आणि मार्जिनल स्पेसमध्ये व्यवसाय करणाऱ्यावर कारवाईचे सत्र सुरू केल्यामुळे पदपथ मोकळे दिसत होते. पनवेल पालिका अस्तित्वात आल्यावर हळूहळू राजकीय कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे फेरीवाल्यांना अभय मिळाले आहे.
--------------------------
दररोज पन्नास रुपयांची वसुली
- दैनंदिन बाजार व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून दैनंदिन पन्नास रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे खारघर वसाहतींमध्ये फेरीवाल्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते.
- याबाबत विचारणा केली असता, पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून पन्नास रुपये आकारणी केली जात असल्यामुळे पालिकेकडून होणाऱ्या कारवाईची भीती नसते. त्यामुळे दररोज नवनवीन फेरीवाले व्यवसाय करण्यास पुढे येत आहे.
-----------------------------
खारघरमध्ये काही माजी नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते एका दिवसाचे ५० हजार ते एक लाख रुपये हप्ते घेऊन वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आठवडे बाजार चालवतात. त्याचा परिणाम स्थानिक फेरीवाल्यांच्या व्यवसायावर होत आहे.
- लीना गरड, माजी नगरसेविका, खारघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com