महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाचा प्रामाणिकपणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाचा प्रामाणिकपणा
महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाचा प्रामाणिकपणा

महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवानाचा प्रामाणिकपणा

sakal_logo
By

किन्हवली, ता. ८ (बातमीदार) : महाराष्ट्र सुरक्षा दलात सुरक्षा रक्षक म्हणून डोंबिवली स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या जवानाच्या प्रामाणिकपणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. किन्हवली परिसरातील परटोली येथील रमेश रविकांत ढमके याने रेल्वेमध्ये विसरलेल्या एका प्रवाशाची ५० हजार रोकड व इतर साहित्य प्रामाणिकपणे परत केले असून त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरात असलेल्या परटोली येथील रमेश हे महाराष्ट्र सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानकावर दीड वर्षांपासून कर्तव्यावर आहेत. मंगळवारी (ता. ६) डोंबिवली स्थानकात फलाट क्रमांक ४ वर कर्तव्यावर असताना दुपारी साडेबारा वाजता घाटकोपर नियंत्रण कक्षातून आलेल्या कॉलद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण ट्रेनमधून मुलुंड येथे उतरलेल्या गौतम भद्रा (वय ५०) या प्रवाशाची पन्नास हजार रुपये रोकड व इतर साहित्य पुरुषांच्या प्रथम वर्ग डब्यात विसरले असल्याची माहिती त्यांना मिळाली. लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तानाजी चव्हाण, हेड कॉन्स्टेबल केशव कदम, सुरक्षा रक्षक रोहिदास, रमेश ढमके ही टीम तपासणी करत असताना रमेश यास रेल्वेच्या डब्यातील वरच्या भागात असलेल्या कॅरीअरवर ही बॅग आढळून आली.

-----------
प्रशस्तिपत्र देऊन गौरव
सापडलेल्या बॅगेची पोलिस उपनिरीक्षक कमलउद्दीन भैरकदर यांच्या समक्ष शहानिशा केली असता त्यात लिफाफामधील ५० हजार रुपये रोख व दोन जेवणाचे डबे, पाण्याची बाटली आदी वस्तू आढळून आल्या. साहित्याची खातरजमा करून गौतम भद्रा या प्रवाशाला डोंबिवली स्थानकात बोलावून त्यांना ते स्वाधीन केले. कर्तव्यावर असताना कामगिरीतील प्रामाणिकपणाबद्दल सुरक्षा रक्षक मंडळाने दखल घेऊन ढमके यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला.