उल्हासनगरात पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

उल्हासनगरात पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

उल्हासनगर, ता. ८ (बातमीदार) : महिन्यातून अनेक दिवस पिण्याच्या पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’ असा प्रकार उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरामधील बऱ्याच भागांमध्ये सुरू आहे. पाणी मिळण्यासाठी विशेषतः महिलांवर जागता पहारा करण्याची वेळ येत असून या शापातून सुटका व्हावी, याकरिता संतप्त नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धडक दिली आहे.
दहाचाळ, भीमशक्ती, डिफेन्स कॉलनी, अशोक वन, बुद्ध कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाईड शाळा या भागात रात्री पावणेबारा; तर सुभाष टेकडी, साईबाबा नगर, आम्रपाली नगर, पंचशील नगर, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, गुरुद्वारा येथे रात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास पिण्याचे पाणी सोडले जाते. यासाठी रात्री उशिरापर्यंत जागावे लागते. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल होत आहेत. यापूर्वीही पाणी सोडण्याची वेळ निश्चित करण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत. काही दिवस सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आल्यावर पुन्हा रात्रीचा खेळ चालेची परिस्थिती निर्माण होत असते. आम्हाला पूर्वीच्या वेळेप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा. पाण्याचा दाब वाढवून देण्यात येवा; अन्यथा उपोषण अथवा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

---------------
शाखा अभियंत्यांचे आश्वासन
बऱ्याचदा पाण्याचा दाब हा कमी राहत असल्याने नागरिकांवर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येते. शेवटी या नित्याच्या प्रकाराचा बांध फुटला. समाजसेवक संजय वाघमारे, ॲड. प्रशांत चंदनशिव, रवींद्र रडे, प्रशांत पवार, रिंकू वाघमारे, शीतल म्हस्के, अनिता पाठारे, लता शिंदे, पंचशीला राजगुरू, ढोके आदींनी सर्टीफाईड शाळेजवळच्या पाण्याच्या टाकीवर धडक दिली. शाखा अभियंता हरेश मिरकुटे यांनी नागरिकांची भेट घेऊन येत्या काही दिवसांत पाणी सोडण्याच्या निश्चित वेळेवर तोडगा काढला जाणार, असे आश्वासन दिले.

----------------
पाणीवाले बाबांचे कार्य
या परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे हे पाणीवाले बाबा म्हणून ओळखले जातात. वाघमारे सातत्याने पाणीपुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून पाणी येण्याच्या वेळेची खात्री करून घेतात. त्यानुसार ही माहिती मासमीडियावर व्हायरल करून नागरिकांना सजग करतात; मात्र पाण्याच्या रात्रीच्या वेळेने महिला नागरिकांवर जागता पहारा देण्याची वेळ येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com