कुर्बानीसाठी पालिकेच्या तपासणी केंद्राचाच वापर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्बानीसाठी पालिकेच्या तपासणी केंद्राचाच वापर करा
कुर्बानीसाठी पालिकेच्या तपासणी केंद्राचाच वापर करा

कुर्बानीसाठी पालिकेच्या तपासणी केंद्राचाच वापर करा

sakal_logo
By

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या केंद्रावरच तपासणी केलेल्या जनावरांशिवाय इतर ठिकाणाहून कुर्बानीसाठी आलेली जनावरे व त्यांचे मांस बाहेरगावी नेणाऱ्या व्यक्तींवर संबंधितांनी तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी दिले. बकरी ईदनिमित्ताने घेतलेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी ही माहिती दिली.
भिवंडी शहरामध्ये अनेक भाषिक नागरिक राहत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडीमध्ये विविध भाषिकांचे सण, उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरे केले जातात. यासाठी भिवंडी महापालिका व पोलिस प्रशासन यांचा संयुक्तिकपणे सहभाग असतो. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच मुंबई महानगरपालिकेने ठरवलेल्या धोरणानुसार भिवंडीत दरवर्षीप्रमाणे बकरी ईद साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने मुस्लिम बांधवाकरिता अनेक प्रकारच्या सेवा-सुविधा पुरवणेबाबत आणि विविध कामांचे नियोजन करण्यासाठी महापालिका मुख्यालयामध्ये आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नियोजन बैठक पार पडली.
बैठकीचे औचित्य साधून पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन महापालिकेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त दीपक झिंजाड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीस शहर अभियंता सुनील घुगे, पशु संवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजीत हिरवे, सहायक आयुक्त प्रिती गाडे, सरव पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक, प्रभाग समिती १ ते ५ चे प्रभाग अधिकारी, सर्व सबंधित विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

------------------
ईदसाठी पालिकेच्या सुविधा
भिवंडी शहरामध्ये अनेक धर्मियांचे सण, उत्सव साजरे करताना त्यांना आवश्यक त्या सेवासुविधा महापालिकेतर्फे पुरवल्या जातात. त्यामुळे हे सर्व सण आजपर्यंत आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सध्या येणारा मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद हा सणही आपण उत्साहात साजरा करणार आहोत. त्यामुळे आरोग्य, स्वच्छता, मेहनताना तत्वावर मजूर पुरवणे, वाहने उपलब्ध करणे, जनावरांच्या डॉक्टरांची नियुक्ती करणे, वाहतुकीचा मार्ग निश्चित करणे, तात्पुरत्या स्वरूपात पोलिस प्रशासनामार्फत कुर्बानी सेंटरना ना-हरकत देणे, पाणीपुरवठा करणे, औषध फवारणी करणे, हार्डवेअरचे साहित्य पुरविणे अशा आवश्यक सेवा-सुविधा पुरवल्या जातात. सर्वांनी बकरी ईद सण गेल्या वर्षीप्रमाणेच आनंदात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सज्ज राहावे, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या वेळी दिल्या.