
महिलेची गळफास घेत आत्महत्या
ठाणे, ता. ८ (वार्ताहर) ः एका महिलेने आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना ठाण्याच्या चिरानगर परिसरातील बौद्धविहाराजवळलील चाळीत गुरुवारी (ता. ८) घडली. सारिका चव्हाण (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. वर्तकनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सारिका चव्हाण या बौद्ध विहाराजवळ असलेल्या साईकृपा चालीत राहत होत्या. गुरुवारी सकाळी ८ वाजता त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरीच आढळून आला. याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.