सरीताच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरीताच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे
सरीताच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे

सरीताच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे

sakal_logo
By

नेरळ, ता. ८ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडी येथील सारिका रामदास पिरकर या मुलीचा पाणी आणताना बुधवारी अपघाती मृत्यू झाला होता. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रशासन पळसदरी ठाकूरवाडीमध्ये पोहचले. नायब तहसीलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सजित धनगर, स्थापत्य अभियंता गोवर्धन नखाते यांनी सारिकाच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. तसेच ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये म्हणून बोअरवेलची तात्काळ दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. वाडीत तात्पुरत्या स्वरूपात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे सरपंच जयेंद्र देशमुख यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यातील खोपोली-मुरबाड-शहापूर राष्ट्रीय महामार्गावर डोंगरावर पळसदरी ठाकूरवाडी आहे. वाडीत पाण्यासाठी विंधन विहिरीची सोय आहे. मात्र, बोअरवेलमध्ये बिघाड झाल्याने पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. सारिका पिरकर ही रेल्वेच्या धरणातून पाणी आणण्यासाठी गेली होती. महामार्ग ओलांडताना भरधाव वेगाने आलेल्या कारने तिला जोराची धडक दिली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून या गावातील पाण्यासाठीची जीवघेणी वणवण समोर आणली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पळसदरीत धाव घेतली. या वेळी गावातील पाण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. नादुरुस्त बोअरवेल तात्काळ दुरुस्त करून बसवण्यास सांगण्यात आले. सारिकाच्या मृत्यूनंतर अजून कोणाला आपला जीव गमवावा लागू नये याकरिता सध्या ठाकूरवाडीला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच शासनाकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी सांगितले आहे. दरम्यान, सारिकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अण्णासाहेब वडेत करत आहेत.