
गतीमान पुनर्विकासासाठी सरकार प्रयत्नशील!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पायाभूत सुविधांचा विकास आणि मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास गतिमान करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पुनर्विकास हा राज्य सरकारच्या प्राधान्य यादीत आहे, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाने (मआविम) आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या ‘पुनर्विकास’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन सावे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी पुनर्विकासासंदर्भातील राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुंबईसारख्या महानगरांमध्ये पुनर्विकासाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच गृहनिर्माण हे सध्या याच कारणांमुळे लक्ष केंद्रित करणारे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. शहरी भागांच्या विकासासाठी विविध योजनांची रूपरेषा आखण्यात आली आहे. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहे. महाराष्ट्रात वाढ आणि विकासाची प्रचंड क्षमता आहे. अशावेळी पुनर्विकास हा महत्त्वाचा विषय बनतो, असे सावे या वेळी म्हणाले. या कार्यक्रमाला ‘मआविम’चे अध्यक्ष रवींद्र बोरतकर, उपाध्यक्ष मीनल मोहाडीकर उपस्थित होते. ‘मआविआ’चे प्रादेशिक संचालक चेतन रायकर यांनी आभार मानले.
विविध विषयांवर मार्गदर्शन
चर्चासत्रात ‘पुनर्विकासासमोरील आव्हाने’ या विषयावर ‘पेटा’चे अध्यक्ष मनोज दुबल, ‘पुनर्विकास सद्यस्थिती’ या विषयावर ‘क्रेडाई’चे अध्यक्ष डोमणिक रोमेल, ‘म्हाडा इमारतींचा पुनर्विकास’ या विषयी व्यावसायिक सल्लागार सुयोग शेट यांनी पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘सॉलिसिस लेक्स’चे व्यवस्थापकीय संचालक अमित मेहता, मुंबई बँकेचे व्यवस्थापक उदय दळवी, ‘एनआरईडीसीओ’चे अध्यक्ष राजन बांदेलकर, एन. एम. कन्सल्टंट्सच्या संचालक नीता शाह यांनीही मार्गदर्शन केले.