
संजय राऊत धमकी प्रकरणी दोन आरोपी ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.९ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले दोघेही आरोपी गोवंडी येथील राहणारे आहेत. यामध्ये सुनील राऊत यांना धमकी मिळाली होती, परंतु त्यांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. याप्रकरणी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नसल्यामुळे पोलिसांनी सध्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तक्रार दाखल होताच दोघांना अधिकृतरीत्या अटक केली जाणार असल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे.
शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली. ''सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू, या महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू” अशी धमकी देण्यात आल्याचे सुनील राऊत यांनी माध्यमांशी सांगितले आहे. “गुरुवारी ८ जून रोजी चार वाजण्याच्या सुमारास मला तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली.” असेही सुनील राऊत यांनी सांगितले. यापूर्वीही संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी पुण्यात एकाला अटक करण्यात आली होती.