अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबीयांचीही आरोग्य तपासणी
पालघर, ता. १५ (बातमीदार) : कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल, असे वाटले होते; मात्र त्यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी कर्तव्य बजावले. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागांवरील भरतीच्या प्रक्रियेला गती देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या जागा रिक्त असतील, तिथे भरती करण्यात यावी, त्यासाठी विभागाला प्रस्ताव पाठवायची गरज नाही. या जागा तातडीने भरल्या जातील, त्याच्यासाठी प्रस्ताव पाठवून त्याची मंजुरी घ्यायला गेल्यास वेळ लागेल. स्थानिक पातळीवर जागा भरण्यात याव्यात, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे अधिकाऱ्यांना दिल्या.
डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबिर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचाही समावेश करण्यात आला. पुढील वर्षापासून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल, असे प्रतिपादन अदिती तटकरे यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता १५ ऑगस्ट ते रक्षाबंधनापर्यंत डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पालघरमधून या शिबिराला सुरुवात करण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या.
खासदार राजेंद्र गावित यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची भरती करावी, नवीन अंगणवाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी मंत्री तटकरे यांच्याकडे केली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, मनीषा निमकर, संदीप पावडे, संदेश ढोणे आदी उपस्थित होते.
अंगणवाड्यांसाठी वाढीव निधीची मागणी
अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती लाख रुपयांत होत नाही. याकरिता तीन लाखांचा वाढीव निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केली. अंगणवाडी दुरुस्तीसाठी दोन लाखांची तरतूद करावी, असा प्रस्ताव अर्थ व नियोजन विभागाकडे देण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी खात्री आहे. दर तीन वर्षांनी अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी वाढवून द्यावा, अशी मागणीही करणार आहोत. अंगणवाडीच्या इमारती नाहीत, तेथे भाड्याने घेतलेल्या असतील, तर ग्रामीण भागात दोन हजार रुपये आणि शहरी भागात चार हजार रुपये भाडे देण्यात येईल, अशी तरतूद असल्याचे तटकरे म्हणाल्या.