
ठाणे, ता. ४ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क ठाणे आणि कोकण भरारी पथकाने सोमवारी (ता. ४) जप्त केला. याप्रकरणी उत्पादन शुल्क पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या मद्याची किंमत ७४ लाख ८ हजार ६४० रुपये असल्याची माहिती निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दिली.
अवैध, बनावट, परराज्यांतील मद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क ठाणे आणि कोकण विभाग यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून हा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. बेलापूर-ठाणे रस्त्यावरून परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली. त्यानुसार दुय्यम निरीक्षक व त्यांच्या पथकाने तुर्भे रेल्वे स्थानकासमोर सापळा रचला होता. दरम्यान, एक ट्रक संशयास्पद आढळून आल्यामुळे त्याची तपासणी केली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यनिर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले बनावट विदेशी मद्याचे ९१८ बॉक्स आढळून आले. भरारी पथकाने आरोपी वाहनचालक तेरसिंग धनसिंग कनोजे (वय ३२), नासीर अन्सार शेख (वय ४५) व गुड्डू देवसिंग रावत (वय ४५ सर्व रा. मध्यप्रदेश) यांच्यासह वाहतुकीसाठी वापरलेला ट्रकही ताब्यात घेतला आहे.