रुग्णांकडून औषधांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णांकडून औषधांची मागणी
रुग्णांकडून औषधांची मागणी

रुग्णांकडून औषधांची मागणी

sakal_logo
By

औषधांच्या चणचणीचा टीबीग्रस्‍तांना फटका
रुग्णांचा थेट अधिकारी वर्गाला सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : एक्सडीआर टीबीने ग्रस्त असलेल्या आपल्या १५ वर्षांच्या मुलीला औषध मिळावे म्हणून एका वडिलांनी सरकारी टीबी डॉट्स सेंटरपासून खासगी मेडिकल स्टोअर्सपर्यंत धाव घेतली, पण त्यांना कुठेही औषध मिळू शकले नाही. या वडिलांप्रमाणेच टीबीने ग्रस्‍त असंख्य रुग्ण व त्‍यांचे नातेवाईक दररोज ‘डॉट्स’ केंद्रात औषध घेण्यासाठी येतात, मात्र त्यांना ‘औषध संपले आहे’ असे एकच उत्तर मिळत आहे. या उत्तरांनी कंटाळलेले रुग्ण आता अधिकाऱ्यांनाच प्रश्न विचारू लागले आहेत.
औषधाअभावी जून महिन्यापासून मुंबईतील ५ हजार एमडीआर टीबीचे रुग्ण त्रस्‍त झाले आहेत. सरकारी केंद्रांवर औषधे उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण खासगी मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करत होते. मात्र आता खासगी मेडिकल स्टोअरमध्येही ही औषधे संपली आहेत. त्यामुळे रुग्ण पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.

परिस्थिती बिघडली
टीबी रुग्णांच्या हितासाठी काम करणारे कार्यकर्ते गणेश आचार्य म्हणाले की, औषधांच्या तुटवड्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख यांना पत्रे लिहिली होती; परंतु परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे.

या तीन औषधांचा साठा संपला
एमडीआर टीबी रुग्णांच्या दुसऱ्या टप्प्यांच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी सायक्लोसरीन, क्लोफाझामाइन आणि लाइनझोलिड ही औषधे केंद्रातून पूर्णपणे संपली आहेत. सर्वात मोठी समस्या सायक्लोसरीन आणि क्लोफाझामाइनशी संबंधित असल्‍याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सायक्लोसरीनचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडे औषधाचा साठा नाही. हे औषध गुजरातमधून दुसऱ्या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे; परंतु औषधांच्या प्रमाणीकरण प्रक्रियेला विलंब होत असल्याने औषध येण्यास विलंब होत आहे. याशिवाय क्लोफाझामाइन हे औषध अनेकदा कुष्ठरोगासाठी वापरले जाते; परंतु एमडीआर टीबी रुग्णांच्या उपचारात हे औषध खूप प्रभावी आहे. या औषधाच्या निर्मितीसाठी कच्चा माल उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

स्टॉक मॉनिटरिंग कमिटी स्थापन करावी
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात टीबी समुदायातील लोकांनी औषधांच्या तुटवड्याबाबत स्टॉक मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीमध्ये क्षयरोग नियंत्रण विभागाचे अधिकारी, औषध पुरवठा तज्ज्ञ आणि क्षयरोग समाजातील सदस्यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.