शहापुरात वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर

शहापुरात वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर

शहापूर (बातमीदार) : सेवा भारती भिवंडी आणि साई ब्लड स्टोरेज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. नीलेश रमणलाल शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महारक्तदान आणि वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजन केले होते. बालक मंदिर शाळेत पार पडलेल्या या शिबिराचे उद्‌घाटन डॉ. प्रसन्न सोमण, डॉ. रवींद्र बडगुजर आणि नंदाबेन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी स्व. नीलेश शहा यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी डॉ. प्रसन्न सोमण यांनी उपस्थितांसमोर वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या वेळी वैद्य अजित पोतदार यांनी साह्य केले. तसेच शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि शिबिरास भेट देणाऱ्या मान्यवरांचे स्वागत अतुल शहा आणि यतीन शहा यांनी केले. रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्रे आणि व्यापारी मंडळ शहापूर यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या. या शिबिरात ७० रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
…..
लाओनथॉन स्पर्धेत कृत्तिका चव्हाण प्रथम
वासिंद (बातमीदार) ः लायन्स अँड लिओ क्लब मोहने-टिटवाळा शाखेतर्फे आयोजित केलेल्या लाओनथॉन स्पर्धेत वासिंदच्या जिंदल विद्यामंदिरची विद्यार्थिनी कृतिका दौलत चव्हाण (इ. ७ वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला. लायन्स अँड लिओ क्लबतर्फे कल्याण तालुक्यातील मोहने येथे तीन, पाच व सात किलोमीटर धावण्याची लाओनथॉन क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. यात एकूण ४९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत वासिंदच्या कृतिका चव्हाणने तीन किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी तिला लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अभिलाषा सिंग आणि सचिव रोहन कोट यांच्या हस्ते तीन हजार रुपये रोख, पारितोषिक, करंडक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कृतिकाला वासिंद येथील जेएसडब्ल्यू एथलेटिक क्लबचे क्रीडा प्रशिक्षक किसन यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
…….
वासिंद : कृतिका चव्हाण हिला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
…..
‘ब्रह्मकुमारी’च्या शिबिरात जान्हवी देशमुख यांची उपस्थिती
शहापूर (बातमीदार) : प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांच्या मुख्य सेवा केंद्रात महिला सशक्तीकरणासाठी सकारात्मक परिवर्तन या चार दिवसीय राष्ट्रीय शिबिराचे आयोजन राजस्थान येथील माऊंट अबू येथे करण्यात आले होते. या शिबिरात काँगेसच्या शहापूरच्या ठाणे जिल्हा ग्रामीण महिला कमिटीच्या जिल्हाध्यक्षा जान्हवी देशमुख यांना आंतरराष्ट्रीय पॅनेल डिस्कशनसाठी पॅनलिस्ट म्हणून बोलावण्यात आले होते.
जान्हवी देशमुख या सामाजिक, राजकीय क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत.
या वेळी जान्हवी यांनी धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातदेखील तितक्याच समर्थपणे कार्यरत असल्याचे दाखवून दिल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
…..
अंबाडीत विधी फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबीर
वज्रेश्वरी (बातमीदार) : अंबाडी नाका येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे विधी फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधी फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून लहान आणि गरजू मुलांना शालेय साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू अन्नदान असे विविध उपक्रम राबवत असते. तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत फाऊंडेशनच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात परिसरातील १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश भोईर, समीर ठाकरे, गणेश ठाकरे, योगेश पाटील, ज्ञानेश्वर कचवे गणेश बोरसे आदींनी परिश्रम घेतले.
…..
‘हरित डोंबिवली’अंतर्गत ३०१ वृक्षांची लागवड
कल्याण (बातमीदार) : विवेकानंद सेवा मंडळातर्फे ‘हरित डोंबिवली’ उपक्रमांतर्गत २५० वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या पाचव्या टप्प्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माणगावच्या परिसरात १८ स्वदेशी वृक्ष लावण्यात आले. हा वृक्षारोपण सोहळा दत्तात्रेय वझे तसेच सामाजिक कार्यकर्ते भास्कर वझे, महिंद्र भोईर आणि शाळेचे शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. दत्तात्रेय वझे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विवेकानंद सेवा मंडळाच्या हरित डोंबिवली अभियानाच्या उपक्रमाचे कौतुक केले. विवेकानंद सेवा मंडळाच्या या अभियानात एकूण पाच टप्प्यांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरात विविध ठिकाणी ३०१ स्वदेशी वृक्ष लावण्यात आले आहेत. पुढील काळात या सर्व वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सर्व पर्यावरणप्रेमी डोंबिवलीकरांनी सहकार्य करावे, अशी विनंती मंडळातर्फे करण्यात येत आहे.
…..
कल्याण : विवेकानंद सेवा मंडळाच्या ‘हरित डोंबिवली’ उपक्रमांतर्गत माणगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
…..
कल्याणमध्ये वैदिक गणित शिबिर
डोंबिवली (बातमीदार) : स्टडी विव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कल्याण पूर्वेतील आनंद ग्लोबल स्कूलमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य वैदिक गणिताचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात एक ते शंभरपर्यंतचे पाढे सोप्या वैदिक पद्धतीने कसे लिहावेत आणि गणित कसे सोडवावे, याचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी केले. या मोफत प्रशिक्षणास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या शिबिराला उपस्थित होते. संस्थेच्या वतीने नेहमी मुलांसाठी शैक्षणिक तसेच बौद्धिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबवले जातात, असे चौधरी यांनी या वेळी सांगितले.
….

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com