धूम स्टाईलने व्यवसायिकाचे पाच लाख लंपास
भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : कारचा पाठलाग करून व्यावसायिकाचे व कारचालकाचे लक्ष दुसरीकडे वळवून हातचलाखीने पाच लाखांची बॅग लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. १४) सायंकाळी भिवंडीत घडली. या चोरीप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीश महाबल शेट्टी (वय ६४) असे व्यावसायिकाचे नाव आहे.
तक्रारदार हरीश महाबल शेट्टी हे कल्याण पश्चिमेतील खडकपाड्यातील गोदरेज हिल येथील सिझर सप्राईडमध्ये राहतात. त्यांचा भागीदारीमध्ये व्यवसाय असून त्यांचा भागीदार भिवंडीतील गोपाळ नगरमध्ये राहतो. दरम्यान, ते व्यवसायासाठी लागणारी पाच लाखांची रक्कम भिवंडीतील मित्राकडून घेऊन गुरुवारी सायंकाळी स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून कल्याणच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी त्यांच्या मागोव्यावर असलेल्या दोन दुचाकीस्वारांनी ५.३० वाजताच्या सुमारास कारच्या पाठीमागून येऊन कारवर जड वस्तूच्या साह्याने जोरात आघात केला. त्यामुळे मोठ्याने आवाज झाल्याने कारची पाहणी करण्यासाठी व्यावसायिक हरीश यांच्यासह कारचालक यांनी साईबाबा मंदिराच्या बाजूस मुख्य रस्त्यावर कार उभी करून दोघेही कारमधून उतरून पाठीमागच्या बाजूस गेले. याचाच फायदा घेत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी हातचलाखीने पाच लाख रुपये असलेली पैशांची बॅग घेऊन धूम स्टाईलने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी व्यावसायिक हरीशच्या फिर्यादीवरून या दोन चोरांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे करीत आहेत.