‘अनुभूती’ला आजपासून सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः भारतीय भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेल्या ‘पासबान-ए-अदब’ या संस्थेचा ‘अनुभूती’ हा साहित्यिक व सांस्कृतिक महोत्सव १६ आणि १७ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव होईल.
या वेळी हिंदी साहित्य, राजभाषा आणि गीत-संगीत विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहरातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थीही या महोत्सवाचे साक्षीदार होणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात खुल्या माईकने होईल. त्यानंतर करिअर मार्गदर्शन, ‘मेरा सफर’ हा कुमुद मिश्रा यांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ज्येष्ठ कवी पद्मश्री अशोक चक्रधर, जमुना प्रसाद उपाध्याय, गीतकार संदीपनाथ, अतहर शकील, समीर सामंत, कुंवर रणजितसिंह चौहान, दीक्षित दानकौरी, मलिका राजपूत यांचे काव्यसंमेलन होणार असून पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता डॉ. अनामिका सिंग यांच्या लोकसंगीत सादरीकरणाने होईल; तर दुसऱ्या दिवशी युवा कवी संमेलन, मिस पद्म नाटक, मुन्शी प्रेमचंद यांचे नाटक आणि दुष्यंत सन्मान होणार आहे. सायंकाळी सहा वाजता अनुप जलोटा यांच्या गझल सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम प्राधान्य या पद्धतीने कार्यक्रमात उपस्थिती नोंदवता येईल, असे आयोजकांनी सांगितले.