दृष्टीक्षेप
बजरंग दलाची ‘शौर्य जागरण यात्रा’
मुंबादेवी (बातमीदार) ः युवकांमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम जागृत व्हावे याकरिता बजरंग दलाने ‘शौर्य जागरण यात्रा’ आयोजित केली आहे. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी दिली. या वेळी त्यांच्यासोबत बजरंग दलाचे विवेक कुलकर्णी, रामचंद्र रामुका, मोहन साळेकर आणि नरेंद्र मुजुमदार उपस्थित होते. दोन राज्यांमध्ये ही यात्रा जवळपास १० हजार कि.मी. अंतराचा प्रवास करेल. प्रत्येक शासकीय जिल्ह्यातून एक यात्रा व प्रत्येक नियोजित तालुका व नियोजित गावांमध्ये जाणार आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी कार्यरचनेच्या दृष्टीने महाराष्ट्र व गोवा यांचे चार प्रांत रचनेत नियोजन केले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
‘हमारा’तर्फे आरोग्य शिबिर
मुंबई (बातमीदार) : रस्त्यावरील निराधार मुलांच्या जीवनाला आकार देऊ पाहणाऱ्या प्राध्यापिका आशा राणे यांच्या हमारा फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधून नुकतेच आरोग्य तपासणी आणि नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन विविध वस्ती, पातळ्यांवर, तसेच महापालिकेच्या शाळेमध्ये करण्यात आले होते. महापालिकेच्या गिल्डर लेन शाळेत फोरम ऑप्टिकचे संचालक डॉ. सुदीप दिलीप राठोड यांच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले; तर रिलायन्स फाऊंडेशनचे डॉ. मुकेश महाजन यांच्या सहकार्याने इंदिरानगर शिवडी झोपडपट्टीतील दोनशेहून अधिक मुले आणि त्यांच्या पालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी संस्थेला ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क’ आणि ‘टाटा सामाजिक विकास संस्थे’च्या विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले.
मुलुंडमध्ये वाचक संवाद कार्यक्रम
मुलुंड (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ संचालित केळकर ग्रंथालयाच्या वतीने ‘वाचक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ‘वॉकिंग ऑन द एज्स’चे लेखक प्रसाद निक्ते हे वाचकांशी संवाद साधत आपला प्रवास उलगडून दाखवणार आहेत. हा कार्यक्रम सोमवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून सर्व साहित्यप्रेमींनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्रमिक विद्यालयात गणेशमूर्ती कार्यशाळा
मुंबई (बातमीदार) : पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तींचे किती महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांमध्ये बिंबवून त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव मिळवून देण्यासाठी श्रमिक विद्यालयात गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या निसर्ग विज्ञान मंडळाच्या पुढाकाराने या कार्यशाळेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या गणेशमूर्ती पाहून संचालिका स्मिता चव्हाण, मुख्याध्यापिका मीनल सरकाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कुर्बानीच्या रकमेतून वह्या वाटप
मालाड (बातमीदार) ः बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीमधील काही रक्कम दान करण्याचे आवाहन सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मालवणीतील कार्यकर्ते वैशाली सय्यद, फिरोझ सय्यद, अफ्रोझ अन्सारी यांनी केले होते. याला प्रतिसाद देत कुर्बानीमधील काही रक्कम एकल महिलांच्या मुलांच्या शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी लोकांनी दिले होते. तसेच पॅराडाईज फाऊंडेशनने ही विद्यार्थ्यांसाठी वह्या दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मिशेल क्षीरसागर यांच्या हस्ते एकल महिलांच्या कुटुंबातील व गरजू असे १५० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.