गिरणी कामगार पात्रता तपासणीसाठी मोफत कक्ष
वडाळा, ता.१८ (बातमीदार) : मुंबईतील ५८ बंद व आजारी गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत गिरणी कामगार आणि वारसांच्या या पूर्वी झालेल्या सोडतींमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार व वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता म्हाडाकडून विशेष अभियान राबवण्यात येत आहे. त्यालाच अनुसरून सन १९८२ नंतरच्या गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या पात्रता तपासणीसाठी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परेल येथील कार्यालयात मोफत कक्ष सुरू करण्यात आला आहे. १ जानेवारी १९८२च्या कामगारांनी ऑनलाइन पद्धतीने म्हाडाकडे अर्ज भरले आहेत, त्यांनी १९८२च्या नंतरचे संबंधित नोकरीच्या पुराव्यासह राष्ट्रीय मिल मजदूर संघाशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे करण्यात आले आहे.