कॉंग्रेसच्या हाती बंडाचा झेंडा

कॉंग्रेसच्या हाती बंडाचा झेंडा

Published on

काँग्रेसच्या हाती बंडाचा झेंडा
सर्वाधिक नऊ बंडखोर; महाविकास आघाडीला फटका, बंड शमविण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याची भिवंडी लोकसभेची एकमेव जागादेखील राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यात आली होती. त्यात विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील काही जागांवर काँग्रेसने दावा केला होता; मात्र या निवडणुकीतही काँग्रेसच्या पदरी निराशा आली असून अवघ्या दोन जागेवर बोळवण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील १३ मतदारसंघात ३० बंडखोरांपैकी सर्वाधिक नऊ बंडखोर उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या नाराजांचे बंड शमविण्याचे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान असणार असल्याचे दिसून येत आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हक्काचा भिवंडी लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला गेला. तेथून सुरेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांनी काम न करण्याचा इशारा दिला होता, तर बंडखोरी करीत अर्ज दाखल करण्याची तयारीदेखील केली होती; मात्र त्यांचे बंड शमविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले होते.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ठाणे जिल्ह्यातील काही जागांवर काँग्रेसने दावा करण्यास सुरुवात केली होती. या वेळी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघावर ठाणे काँग्रेसने दावा केला, तसेच यापैकी एक जागा देण्यात यावी, अशी मागणी केली होती; मात्र ठाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. त्यानंतर काँग्रेसची गरज संपते तेव्हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष डावलत असतात, असा आरोप ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. ठाण्यातील एनकेटी महाविद्यालयात झालेल्या काँग्रेस बीएलए प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यानंतर ठाणे लोकसभा प्रभारी जोसेफ यांच्यासमोर ठाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यथा व्यक्त केली.

दरम्यान, ठाणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात येत असताना, ठाणे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ भिवंडी पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक चार, तर कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, अंबरनाथ आणि बेलापूर या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रत्येकी एक याप्रमाणे बंडखोराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत या बंडोबांचे बंड थंड करण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल.


ठाकरेंचे सहा, तर शिंदेंचे पाच बंडखोर
ठाणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने अनेक पदाधिकारी मतदारसंघात कामाला लागले होते. मतदारांच्या भेटीगाठी घेणे, विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी आणण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसले; मात्र तिकीटवाटपात महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा ठरलेला फॉर्म्युला यामुळे सर्वांना संधी देणे काठीण झाले होते. त्यातून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा उगारला. ठाणे जिल्ह्यातील १३ विधानसभा मतदारसंघात ३० बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये ठाकरे गटाचे सहा, शिंदे गटाचे पाच, भाजपचे चार, अजित पवार गट आणि एमआयएमच्या प्रत्येकी दोघांनी, तर शरद पवार गटाच्या एकाने बंडखोरी करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com