आकाश कंदील, दिव्यांनी उजळले शहर
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी नवी मुंबई, पनवेल शहर उजळले असून, दीपोत्सवातील उत्साह ओसंडून वाहत आहे. पारंपरिक उत्साहात आज सर्वत्र नरक चतुर्दशी साजरी झाली. दरम्यान, बाजारपेठेतही यंदा तेजी असून, सायंकाळनंतर खरेदीसाठी पनवेलकरांनी सहकुटुंब भर दिला आहे. तेज, चैतन्य, सुख-समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या मंगलमय दिवाळीनिमित्त वाशी, नवी मुंबईसह पनवेलची बाजारपेठ सजली आहे. शिवाय लक्ष लक्ष दिव्यांनी घरे, अंगण, शहर उजळले असून दागिने, दुचाकी-चारचाकी वाहने, कपडे, भेटवस्तू, मिठाई, सुकामेवा आदींच्या खरेदीची ग्राहकांची लगबग सुरू आहे.
व्यापारी, व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अक्षरशः विविध सवलत योजनांची आतषबाजी केली आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी विविध स्वरूपांतील वस्तू खरेदीचे नागरिकांनी नियोजन केले आहे. दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश जणांच्या हातात पगार आणि बोनस मिळाला. त्यानंतर पहिल्यांदा घरातील फराळसाठीचे साहित्य खरेदी आणि त्यानंतर आता कपडे, दागिने, वाहन, फटाके, गृहोपयोगी वस्तू, स्मार्टफोन, लॅपटॉप आदींची खरेदी; तर फ्लॅटच्या बुकिंगची लगबग सुरू आहे. त्यांच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांनी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात वाहन खरेदीवर पाच टक्के कॅशबॅक, १० वर्षांची वॉरंटी, एक्स्चेंज, शंभर टक्के विमा; तर रेडिमेड कपड्यांवर ट्रॅव्हल बॅग, एका ड्रेसवर एक ड्रेस मोफत, लकी ड्रॉ, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी वस्तूंवर तीन वर्षे वॉरंटी, डाऊन पेमेंट कमी, शून्य टक्के व्याज, सायकल, इंडक्शन, पॅन, कुकवेअर भेट; तर दागिन्यांची घडणावळ, मजुरीवर १० ते १५ टक्क्यांची सवलत आदींचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांचा खरेदीचा उत्साह वाढला आहे. शिवाजी चौक, लाईन आळी, टिळक रोड, कापड गल्ली आदी परिसरात, तसेच कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल, खारघर वसाहतीमधील शोरूम, दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे.
------------
कोट्यवधींची उलाढाल होणार...
दिवाळीनिमित्त कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्टफोन, दागिने, आदींच्या विविध व्हरायटींनी शोरूम, दुकाने सजली आहेत. त्यांना विद्युत रोषणाई, फलकांनी आकर्षक सजावट केली आहे. दिवाळीच्या पुढील दोन-तीन दिवसांमध्ये नवी मुंबई, पनवेलच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे.
-----------------
पूजा साहित्यातूनही मोठी उलाढाल
दिवाळीच्या इतर खरेदीसह नागरिकांचा पूजा साहित्य खरेदीसाठी अधिक गर्दी झालेली दिसून आली. लक्ष्मी मूर्ती, पणत्या, झाडू, रांगोळी छापे, शुभ-लाभ, लाल कापड, चौरंग, पाठ, रांगोळी असे विविध प्रकारचे पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी उसळली होती. यातूनही मोठी आर्थिक उलाढाल दरवर्षी होत असते.
-------------
रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर गर्दी
लक्ष्मीपूजन, पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. वसूबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला असला तरी आता खऱ्या अर्थाने मुख्य पर्वाला नरक चतुर्दशीपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. अशात रस्त्यांवर वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. मुख्य रस्त्यांवर गर्दीतून वाहन काढताना नागरिकांना घाम फुटत आहे.
-------------
फूल बाजारात रंगपंचमी
लक्ष्मीपूजन, पाडव्यासाठी झेंडू, शेवंतीसह विविध फुले दाखल झाली आहेत. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडव्यानिमित्त फुलांना मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर झेंडू, शेवंती आणि विविध प्रकारच्या फुलांनी मार्केट यार्डातील फूल बाजार सजला आहे. दुकाने, कार्यालये सजावटीसाठी ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. दिवाळीनिमित्त बाजार परिसर झेंडूच्या फुलांनी बहरला असला तरी झेंडूच्या भावाने चांगलीच उसळी घेतली आहे. मागील आठवड्यात ४० ते ५० रुपये भावाने विकल्या जाणाऱ्या झेंडूचा भाव २०० रुपयांवर पोहोचला आहे. मोठमोठी आस्थापने, हॉटेल, दुकाने, वाहने, घर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर झेंडू आणि इतर फुले खरेदी केली जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

