नवी मुंबईकर रंगले हास्य संध्येत
नवी मुंबईकर रंगले हास्य संध्येत
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला रंग चढू लागला असताना केजागर्ती अर्थात कोण जागे आहे? असे विचारून जागे करण्याची वेळ आली आहे. हाच धागा पकडून नवी मुंबई प्रेस क्लबने एक अनोखे पण लोकप्रिय ज्येष्ठ कवींच्या हास्य संध्येचे आयोजन मंगळवारी वाशीत केले होते.
विडंबन, हास्य कविता व खुर्चीला मध्य समजून मारलेल्या गप्पांमुळे व मार्मिक, खुसखुशीत भाष्यामुळे कार्यक्रम नवी मुंबईकरांची दाद मिळवून गेला. लोकांच्या सामाजिक जाणिवेला हात घालणाऱ्या या हास्य संध्येचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी महेश केळुसकरांनी नेहमीच्या हास्य चौकार व षटकारांनी केले. अमरावतीहून आलेले ज्येष्ठ कवी मिर्झा बेग हे महाराष्ट्राला जांगडगुट्टा व मिर्झा एक्स्प्रेसमुळे परिचित आहेतच. त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात वरहाडी भाषेतील कवितेने करून समयोजित किस्से, विनोद सांगून काव्यसंध्येला छानशी सुरुवात करून दिली. ज्येष्ठ कवी व महाराष्ट्राला विडंबनकार म्हणून सुपरिचित असलेले रामदास फुटाणे यांनी कसदार खेळाडूसारखे विडंबनाचे फटके मारून तथा पूर्वीच्या त्यांच्या विडंबन कविता आजही किती समायोचित वाटतात, हे दाखवून देत आता कवी म्हणून थांबावेसे वाटते ही खंत बोलून दाखवली. ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक श्रीकांत बोजेवार हे त्यांच्या तंबीदुराई स्तंभ लेखनामुळे प्रसिद्ध आहेतच, पण आजच्या सद्यपरिस्थितीला त्यांनी काव्यातून घेतलेले चिमटे लाजवाबच होते, तर महेश केळुसकरांनी त्यांचीच एक कविता नेत्यांच्या बायकांचे उखाणे अशी काही पेश केली की टाळ्यांच्या कडकडाटाने विष्णुदास भावे सभागृह दणदणून गेले.
या वेळी ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांनी पळून नेलेले वा हॉटेलात ठेवलेले नेते तिथे काय करतात याची ब्रेकिंग न्यूजच नवी मुंबईकरांना आपल्या किश्यांद्वारे दिली. महेश केळुसकर यांनी सूत्रसंचालनासोबतच त्यांच्या राजकीय व्यंग कविता सादर केल्या. सध्याच्या राजकीय वातावरणात, राजकारणाचा संदर्भ घेऊन व्यंगाची साथ असताना रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची कसब या कवी लोकात आहे, हे मात्र निर्विवाद सत्य. या हास्य संध्येला उपस्थित राहिलेले नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हास्याचा आनंद लुटत नवी मुंबईकरांना दीपावलीच्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

