कोळी महिला साजरी करणार काळी दिवाळी!
कोळी महिला साजरी करणार काळी दिवाळी!
-सावत्र बहिणीच्या वागणुकीमुळे महिलेच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह; पुनर्वसनानंतरच उभारा बेलासिस पूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : ताडदेव बेलासिस पूल येथील मासळीविक्रेत्या कोळी महिलांना महापालिकेतील डी वॉर्डमधील अधिकाऱ्यांच्या दुजाभावामुळे यंदा काळी दिवाळी साजरी करण्याची नामुष्की ओढवली आहे. जोपर्यंत योग्य पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पुलाच्या बांधकामाची एक वीटसुद्धा रचू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने घेतली आहे.
ताडदेव येथील बेलासिस पूल येथे १९७० सालापासून परंपरागतरीत्या ३६ मासळी विक्री दुकाने (ओटा) कार्यरत आहेत. या मासळी दुकानांमध्ये भूमिपुत्र मासळी विक्रेत्या कोळी महिला आपला उदरनिर्वाह करीत आले आहेत. या सर्व कोळी महिलांना पालिकेअंतर्गत परवानाधारक म्हणून नोंद आहे. दुर्दैवाने महापालिकेतील अधिकाऱ्यांमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे या कोळी महिलांनी सांगितले.
पाच दशकांपासून व्यवसाय करणाऱ्या एकूण ३६ मासेविक्रेत्या कोळी महिलांपैकी फक्त पाच महिलांना वर्तमान परवाने देण्यात आले आहेत. इतर ३१ महिलांच्या परवान्याचे नूतनीकरण वाॅर्डमधील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या मालकीचे शेकडो वर्षांपूर्वीचे बेलासिस पुलाचे बांंधकाम करण्याचे नियोजन आहे. पुलालगतच्या इतर दुकानदारांना पालिकेकडून नोटीस देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, परंतु येथील मासळीविक्रेत्या कोळी महिलांना पालिकेकडून पुनर्वसनासंदर्भात लेखी स्वरूपात काहीच दिले नाही. त्यामुळे कोळी महिलांचे भविष्य अंधारात असल्याचे समितीचे मुंबई शहर अध्यक्ष प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले.
पालिकेकडून दुजाभाव
मासळी दुकानांच्या मागील बाजूस द ग्रेट रॉयल बिल्डिंगने पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतरीत्या गार्डनची उभारणी केली आहे, परंतु त्यांना पालिकेने कसलीच नोटीस बजावली नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून भूमिपुत्रांवरील दुजाभाव प्रखरपणे दिसून येत असल्याचे भोईर यांनी सांगितले.
पुनर्वसन करण्याची मागणी -
मासळीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांचे पुनर्वसन पालिकेच्या मालकीच्या जागेतच करण्याची मागणी मच्छीमार समितीने निवेदनाद्वारे केली आहे. द ग्रेट रॉयल बिल्डिंगने पालिकेच्या मालकीच्या जागेवर उभे केलेले गार्डन ताब्यात घेऊन मासळीविक्रेत्या महिलांना येथेच पुनर्वसन करण्याची मागणीसुद्धा समितीची आहे.
आंदोलनाचा इशारा
रस्त्याच्या बांधकामांमुळे मासळीविक्रेत्या कोळी महिलांना हटवण्यात येत आहे. सर्व मासळीविक्रेत्या कोळी महिला कायद्याने प्रकल्पबाधित असल्यामुळे त्यांचे योग्य पुनर्वसन केल्याशिवाय त्यांच्या दुकानांवर बुलडोझर न फिरविण्याची विनंती पालिकेला करण्यात आली आहे. पालिकेने मासळीविक्रेत्या कोळी महिलांचे योग्य पुनर्वसन केले नाही, तर उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष देवेंद्र तांडेल म्हणाले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोळी महिलांवर होणारी कार्यवाही संविधानाची विटंबना आहे. या विषयाशी निगडित संबंधित अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करण्याचा मागणी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे करण्यात आली आहे.
़- देवेंद्र दामोदर तांडेल
अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

