प्रकाशाच्या सणाला उधाण

प्रकाशाच्या सणाला उधाण

Published on

वसई, ता. ३१ (बातमीदार) : दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटेपासूनच तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. पालघरनगरीत गुरुवारी (ता. ३१) पहाटे फटाक्यांची आतषबाजी, तर कुठे गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करून दिपावलीची सुरुवात झाली. अंगणासह प्रशासकीय कार्यालयात सुबक, आकर्षक रांगोळीचा सडा काढण्यासाठी महिलांमध्ये शर्यत पहावयास मिळाली. खरेदीसाठी बाजारपेठादेखील सजल्या होत्या. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसरात झगमगाट दिसून आला.

दिवाळीचे पहिले स्नान गुरुवारी करण्यात आले. त्यानंतर देवाची पूजा अर्चा करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. आपल्या परंपरा जपण्यासाठी तरुणाईदेखील पुढे येत आहे. घराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली, तर अंगणात रांगोळी काढण्यात आली होती. याचबरोबर नवीन कपडे, विद्युत उपकरणांची दुकाने, वाहनांचे शोरुम, भांड्यांच्या दुकानांना देखील सजवण्यात आले आहे. सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.

दिवाळीनिमित्त पालघरमध्ये ठिकठिकाणी सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे चकली, लाडू व अन्य दिवाळी फराळावर ताव मारताना गाण्यांचा आस्वाद घेतला जात आहे. एकीकडे विधानसभेच्या निवडणुका असल्या तरी पालघरनगरीत दिवाळीचा आनंद नागरिकांमध्ये अधिक दिसून आला.

दर्शनासाठी रांग
गुरुवारी सकाळपासून मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागल्याचे दिसून आले. दिवाळीची सुरुवात भक्तिभावात तल्लीन होऊन करावी, याकडे तरुणाईचा कल दिसून आला. नवीन कपडे परिधान करून भाविक मंदिरात आले होते.

समाजमाध्यमांवर संदेशाचा वर्षाव
आपल्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभावी असलेल्या समाजमाध्यमांवर संदेशाचा वर्षाव होत होता. नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

दिवाळीनिमित्त सवलत
दिवाळी सणाला वाहन, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे दुकानदारांनी विविध वस्तूंवर आकर्षक सवलत दिली आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करतील, अशी आशा दुकानदारांकडून व्यक्त करण्यात आली. याला ग्राहकांचा प्रतिसाददेखील मिळू लागला आहे.

फटाक्यांच्या दुकानात गर्दी
पालघरमध्ये फटाक्यांची दुकाने सज्ज झाली आहेत. लहान मुलांपासून ते अगदी मोठी मंडळी फटाके खरेदी करू लागली आहेत. अधिक फटाके विकत घेतल्यास त्यावर सूटदेखील दिली जात आहे.

झेंडूचा भाव वधारला
फुलांच्या मंडईत मोगरा, झेंडू, शेवंती, जाई-जुई, गुलाब व अन्य फुलांचे भाव वाढले आहेत. नागरिकांकडून तोरण आणि पूजेसाठी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची खरेदी केले जात आहे. अचानक फुलांची मागणी वाढल्याने एक किलोची किंमत १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. असे असले तरी ग्राहकांची मागणी कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com