एकाच व्यासपीठावर सर्वपक्षीय उमेदवार
एकाच व्यासपीठावर सर्वपक्षीय उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ : दिवाळी पहाटनिमित्त डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली व कल्याण ग्रामीणच्या उमेदवारांनी फडके रोडवर तरुणांना शुभेच्छा दिल्या. या वेळी महायुतीचे रवींद्र चव्हाण, राजेश मोरे व महाविकास आघाडीचे दीपेश म्हात्रे हे एकाच व्यासपीठावर आले, तर मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी सगळ्यात शेवटी येत आपला वेगळा तोरा दाखवून दिला. या वातावरणामुळे निवडणुकीच्या प्रचारात एक वेगळीच रंगत चढणार आहे, असे म्हटले जात आहे.
दिवाळी पहाट आणि फडके रोड हे समीकरण डोंबिवलीत दर दिवाळीला पाहायला मिळते. दिवाळी पहाटनिमित्त आबालवृद्धांसह तरुणाई येथे गर्दी करते. या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी, तसेच शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय नेते, खासदार, आमदार यांनी यापूर्वी फडके रोडवर उपस्थिती लावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक
युतीचे रवींद्र चव्हाण व आघाडीचे दीपेश म्हात्रे हे उमेदवार फडके रोडवर उपस्थित होते. एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ते एकत्रित आले. याचवेळी शिंदे गटातील, तसेच दीपेश म्हात्रे यांचे मोठागावमधील शेजारी असलेले कल्याण ग्रामीणचे युतीचे उमेदवार राजेश मोरे हेदेखील याच व्यासपीठावर उपस्थित होते. युतीचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आणि शिंदे गटाशी बंडखोरी करत ठाकरे गटातून उमेदवारी मिळवत त्यांच्यासमोर आव्हान उभे करणारे दीपेश म्हात्रे आता नक्की काय संवाद साधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आमदार चव्हाण यांनी संवाद साधताना म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या तिघांच्या नेतृत्वात हिंदू सण आणि हिंदू सणाची परंपरा जपण्याचे काम होत आहे. आमचे सरकार सर्व सणांना प्राधान्य देत आहे, पूर्वी सर्व सणांवरती पाबंदी होती. अटी-शर्ती होत्या, त्या रद्द करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रोजगार आणि एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली योजना देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात वातावरण आहे, असे सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार दीपेश म्हात्रे म्हणाले, सांस्कृतिक व्यासपीठावरून मी राजकारण करणार नाही. मी इथे राजकीय भाषण करण्यास आलेलो नाही. दिवाळीमध्ये राजकारण करायचे नसते, पण आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि डोंबिवलीमध्ये परिवर्तन घडवा एवढेच या ठिकाणी सांगतो, असे म्हणत म्हात्रे यांनी चव्हाण यांचे नाव न घेता त्याच मंचावर त्यांना टोला मारला. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी सगळ्यात शेवटी प्रवेश करत गणपती मंदिरात गणेशाचे दर्शन घेतले. तरुणांसोबत सेल्फी काढत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वात जवळीक भाजपशी
भाजपचे मुख्यमंत्री व्हावे याविषयी मनसेची भूमिका काय, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राजू पाटील म्हणाले की, राज ठाकरे यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी इतर वेळी कबूलदेखील केले आहे. माझी सर्वात जास्त इतर पक्षात जवळकी कोणाशी असेल तर ती भाजपशी आहे. त्याअनुषंगाने फडणवीस मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच सदा सरवणकर उमेदवारी मागे घेतील की नाही हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोणाच्या भरवशावर नाही. आम्ही तिथे लढणारच आहोत. अमित ठाकरे यांची इच्छा आहे की निवडणूक लढवावी. कोणाला मस्का लावून आम्हाला निवडणूक लढवायची नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

