गुंतवणूकदारांना गंडा घालणारा महाठग गजाआड
गुंतवणूकदारांना गंडा घालणारा महाठग गजाआड
२७ लाख ६५ हजार रुपये उकळल्याचे उघड
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : अवाजवी व जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून २१ गुंतवणूकदारांकडून २७ लाख ६५ हजार रुपये उकळून परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ठगाला गुन्हे शाखा कक्ष एकच्या पथकाने सापळा लावून अटक केली आहे. भोलाकुमार चौधरी (वय ३३) असे या महाठगाचे नाव असून गुन्हे शाखेने वेळीच त्याला पकडल्याने अनेक नागरिकांची फसवणूक टळली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी भोलाकुमार चौधरी हा मुंबईतील सांताक्रूझ भागात राहण्यास असून त्याने जुलै २०२४ मध्ये मुकेश कक्कड या मित्रासह बोल्टकॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी सुरू केली होती. तसेच त्याचे कार्यालय वाशी सेक्टर १७ मधील महावीर सेंटरमध्ये सुरू केले होते. त्यानंतर त्याने अवाजवी लाभ देणाऱ्या योजना आणून गुंतवणूकदारांना अवाजवी व जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून गत सहा महिन्यांमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक त्याच्या कंपनीमध्ये केली. त्यानंतर आरोपी भोलाकुमार चौधरी याने सुरुवातीला गुंतवणूकदारांना दरमहिना नऊ टक्के दराने तीन महिने परतावादेखील दिला; मात्र भोलाकुमार चौधरी हा फसवणूक करण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांना अवाजवी व जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत असल्याचे तसेच तो लोकांना त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष एकला मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखेने गत आठवड्यात वाशीतील बोल्टकॅब मॅनेजमेंट या कंपनीत डमी गुंतवणूकदार पाठवून त्याबाबत पडताळणी केली. त्यानंतर आरोपी भोलाकुमार चौधरी हा गुंतवणूकदारांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले. तसेच नागरिकांकडून कंपनीमध्ये गुंतवलेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
..........................
सातवी पास भोलाकुमारची करामत
या प्रकरणातील आरोपी भोलाकुमार चौधरी याचे फक्त सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने गुंतवणूकदारांकडून आलेल्या रकमेतून बोल्टकॅब मॅनेजमेंट या कंपनीच्या नावाने इलेक्ट्रिक पॅसेंजर कार विकत घेऊन ओला, उबेरप्रमाणे कंपनी सुरू करणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्याने लोकांकडून डाऊन पेमेंटच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कमदेखील स्वीकारली होती. त्यानंतर त्याने सर्व पैसे घेऊन बँकॉक येथे पळून जाण्याची तयारी केली होती; मात्र त्याची करामत वेळीच लक्षात आल्याने गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या.
....................
अवाजवी लाभ देणाऱ्या योजना
गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आणखी गुंतवणूकदार आणल्यास त्यांना गुंतवणुकीच्या रकमेवर पाच टक्के दराने कमिशन देण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. एखाद्या गुंतवणूकदाराने सहा लाख रुपयांची गुंतवणूक आणल्यास त्याला १० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे एकूण सहा महिने रॉयल्टी म्हणून ६० हजार रुपये मिळणार असल्याचेदेखील त्याने सांगितले होते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने तीन लाख रुपयांची गुंतवणूक आणल्यास, त्याला थायलंड येथे पर्यटनाची संधी, आठ लाख रुपयांची गुंतवणूक आणल्यास त्याला आयफोन-१६ बक्षीस देणार असल्याचेदेखील सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

