

विक्रम गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे करून सिडकोची जागा हडप करणाऱ्या भूमाफिया व बांधकामधारकांविरोधात सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने गत वर्षभरापासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल एक हजार ७८७ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून ती जमीनदोस्त केली आहेत. त्यामुळे सिडकोची सुमारे दोन हजार कोटींहून अधिक बाजारमूल्य असलेली तब्बल एक लाख ९५ हजार ४१६ चौरस मीटर (४९ एकर) क्षेत्रफळ जागा अतिक्रमणमुक्त झाली आहे.
नवी मुंबई, पनवेल, उलवे व द्रोणागिरी परिसरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर अतिक्रण करून त्यावर विनापरवानगी इमारती उभारून भूमाफियांनी सिडकोची शेकडो एकर जागा गिळंकृत केलेली आहे. त्यामुळे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाने दररोज अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला आहे. गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करून २,०६,४३१ चौरस मीटर (५२ एकर) क्षेत्रफळ अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळविले होते. या अतिक्रमणमुक्त जमिनीचे बाजारमूल्य दोन हजार ५०० कोटींहून अधिक आहे.
------------------
सिडकोच्या भूखंडांवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना २९६ नोटिसा बजावल्या होत्या; तर अतिक्रमण काढण्यासाठी नियोजित केलेल्या २१८ मोहिमांपैकी अवघ्या १३० मोहिमांमध्ये अनधिकृत बांधकामे तोडण्यात सिडकोला यश आले आहे. या १३० मोहिमांमध्ये एक हजार ७८७ बांधकामे जमीनदोस्त करून सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाने तब्बल १,९५,४१६ चौरस मीटर जमिनीचे क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले आहे. या अतिक्रमणमुक्त जमिनीचे बाजारमूल्य दोन हजार कोटींहून अधिक आहे.
-------------------------
काही भूखंडांचा लिलाव
सिडकोच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले जात असल्याने अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोची मोहीम अधिक तीव्र केली जात आहे. भविष्यात विमानतळासह एज्युसिटी, मेडिसिटी, लॉजिस्टिक पार्क यासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध प्रकल्प नवी मुंबईत कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे सिडकोला जमीन व निधीची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त काही भूखंडांची मार्केटिंग विभागाद्वारे विक्री करून सिडको सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे.
---------------
नवी मुंबई एक सुनियोजित शहर असून, या शहराची अनिर्बंध वाढ रोखणे हे सिडकोचे प्रमुख कर्तव्य आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सिडकोने नेहमीच कठोर पावले उचलली आहेत. त्याअंतर्गतच सध्या सिडकोतर्फे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. ज्यांनी भूखंड हडप केले आहेत ते सर्वप्रथम सिडकोच्या रडारवर आहेत.
- सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको
------------
तीन महिन्यांतील कारवाई
१,७८७ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
२,००० कोटींची जमीन अतिक्रमणमुक्त
१,९५,४१६ चौरस मीटर भूखंड मोकळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.