

पनवेल, ता. १० (बातमीदार) : पंतप्रधानांच्या देशव्यापी उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींचा बुधवारी (ता. ९) पनवेल पंचायत समिती कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा पवार यांच्या हस्ते प्रशस्तपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण भारतात आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून पुढील १०० दिवसांच्या कालावधीत क्षयरोग दूरीकरण मोहीम राबविण्यात आली. क्षयरोग नियंत्रण विभागाने १०० दिवस केलेल्या कामामुळे तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या. या मोहिमेअंतर्गत विविध स्पर्धा, क्षयरुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांविषयी प्रबोधन व घरोघरी जाऊन क्षयरुण शोधण्याची मोहीम घेण्यात आली. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्षयरोगमुक्ती कार्यक्रमात सर्वांना क्षयरोगमुक्तीची शपथ दिली. निक्षय आवाहनाद्वारे गावोगावी जाऊन क्षयरोग निदानासह प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमास विस्तार अधिकारी कनोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश वावेकर, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. सायली मानकर, डॉ. प्रणव उरणकर, डॉ. अब्दुल करीम रझाक उपस्थित होते. या वेळी उत्कृष्ट काम केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निक्षय मित्र हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड तळोजाचे सीएसआर व्यवस्थापक लहू रौंदळ यांचा सन्मान करण्यात आला. या वेळेस सन्मानित पात्र ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी म्हणून सरपंच, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
----------------
रजतपदक व ताम्रपदकाने गौरव
पुरस्काराला पात्र ३२ ग्रामपंचायतींपैकी पाले बुद्रुक, खैरवाडी, बारवई, भाताण, जांभिवली, पोसरी या सहा ग्रामपंचायती सलग दुसऱ्या वर्षी क्षयरोगमुक्त म्हणून पात्र ठरल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी रजतपदक व प्रशस्तिपत्राच्या मानकरी ठरल्या. उर्वरित २६ ग्रामपंचायतींमध्ये देवळोली, सावळे, गुळसुंदे, कराडे खुर्द, दिघाटी, चिखले, वाकडी, दुंदरे, उमरोली, वाघिवली, तुराडे, नांदगाव, सोमटणे, शिरवली, चिंद्रन, केळवणे, पोयंजे, खानाव, मालडुंगी, नितळस, गव्हाण, न्हावा, तरघर, ओव्हळा, पारगाव व वडघर या ग्रामपंचायती ताम्रपदक व प्रशस्तिपत्राच्या मानकरी ठरल्या.
--------------------
आरोग्याबाबत जागरूक राहून या टप्प्यात ३२ ग्रामपंचायती यशस्वी झाल्या. पुढील वर्षी हे उद्दिष्ट वाढविण्यासाठी सर्व जण जोमाने काम करून पनवेल तालुका संपूर्ण क्षयरोगमुक्त करण्याचा प्रयत्न करू.
- डॉ. अपर्णा पवार, तालुका आरोग्य अधिकारी, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.