

सायली रावले, अलिबाग
रायगड जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे पूर, दरडी कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच जीवितहानी होते. किनारी भागांतील धूप प्रतिबंधासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय असल्याने जिल्हा प्रशासनाने बांबू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत यंदा ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने यासाठी रोपवाटिका तयार केल्या असून, या रोपवाटिकांमध्ये ‘मंगा’ जातीची बांबूची रोपे तयार करण्यात आली आहेत. लवकरच या रोपांची लागवड केली जाणार आहे. किनारपट्टीवरील भागात वादळांपासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी या बांबूची मदत होऊ शकणार आहे. त्याचबरोबर बुरूड समाजाला निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी बांबू उपयुक्त ठरणार आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढली आहे. त्यामुळे काही भागाला वारंवार पुराचा सामना करावा लागतो. संशोधकांच्या निरीक्षणानुसार, किनारपट्टीवरील भागात वादळापासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी बांबूची मदत होऊ शकते. बांबूची झाडे त्यांच्या मजबुतीमुळे मातीला धरून ठेवतात, ज्यामुळे किनारपट्टीची धूप कमी होतो. बांबूच्या घनतेमुळे लाटा आणि समुद्राच्या प्रवाहांमुळे होणारे नुकसान कमी होते. त्याचप्रमाणे बांबू कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि ऑक्सिजन बाहेर टाकतो, ज्यामुळे हवा शुद्ध होते. बांबूची लागवड जैवविविधता वाढवते आणि वन्यजीवांसाठी अधिवास निर्माण करते. बांबूची लागवड जमिनीतील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे दुष्काळ आणि पूर यांसारख्या समस्या कमी होतात.
काही वर्षांत रायगड जिल्ह्यातील किनारी भागासह डोंगराळ भागात असणाऱ्या गावांमध्ये सातत्याने पुराचा धोका वाढला आहे. पुराच्या धोक्यामुळे दरवर्षी हजारो नागरिकांना आपला मूळ अधिवास सोडून इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळेच जिल्ह्यात एक कोटी बांबू लागवडीची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. या योजनेंतर्गत या वर्षी ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी रोपे तयार करण्यात आली असून, जून ते जुलैदरम्यान लागवड सुरू केली जाणार आहे. खासगी आणि शासकीय जमिनींवर ही लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना पडीक जमिनी, बांधावर बांबू लागवड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
बांबूच्या लागवडीमुळे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाला मदत होऊ शकेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड केल्यास त्यांना जोड उत्पन्न मिळू शकेल. बुरूड समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येने राहतो. त्यांना परराज्यातून बांबू आणावा लागतो. या लागवडीमुळे जिल्ह्यातच मुबलक प्रमाणात बांबू उपलब्ध होऊ शकेल.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड
बांबू लागवडीचे फायदे :
१. बांबूची लागवड जमिनीतील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे दुष्काळ आणि पूर यांसारख्या समस्या कमी होतात.
२. बांबू वन्यजीवांसाठी अधिवास आणि अन्नस्रोत निर्माण करते, ज्यामुळे त्यांची संख्या वाढते.
३. बांबूचा वापर बांधकाम, फर्निचर आणि विविध वस्तू बनवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि आर्थिक विकास साधता येतो.
४. बांबू नैसर्गिक आणि टिकाऊ आहे, ज्यामुळे तो पर्यावरणास अनुकूल आहे. बांबूचा वापर प्लॅस्टिक आणि इतर हानिकारक सामग्रीच्या जागी करता येतो.
रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड
शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. वैयक्तिक बांबू लागवडीअंतर्गत तीन बाय तीन मीटर या अंतरानुसार एक हेक्टरसाठी एक हजार रोपांची लागवड केल्यास चार वर्षांसाठी लाभार्थ्यांना सात लाखांपर्यंतचा लाभ मजुरी व इतर खर्चाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे.
पूर, वादळी वारा, दरड कोसळणे आदी आपत्ती रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे किनारपट्टीलगत बांबूच्या झाडांची लागवड. कांदळवनाप्रमाणे बांबू वादळी वाऱ्याला सामोरे जातात. लवचिकपणामुळे बांबू सहजासहजी मोडत नाही. दरडग्रस्त भागांमध्ये बांबूची लागवड केल्यास त्या ठिकाणी मातीची धूप कमी होते व दरड कोसळण्याची शक्यता कमी होते. बांबूच्या लागवडीपासून आर्थिकदृष्ट्यादेखील फायदा घेता येऊ शकतो. बाजारामध्ये बांबूच्या काठीला प्रचंड मागणी आहे व चांगला दरदेखील मिळतो.
- सागर दहिंबेकर, अध्यक्ष, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.