अनधिकृत गोदामांचे बांधकाम तोडण्याची मागणी
भिवंडी, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील डोहोळे गावात असलेल्या सरकारी जागेवरील अतिक्रमण करून बांधलेले गोदामे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. डोहोळे ग्रामपंचायत हद्दीतील दफनभूमी, महसुल खात्याची जमीन आणि शासकीय गुरचरण या सरकारच्या जमिनी आहेत. यातील शासकीय गुरचरण जमिनीवरील आदिवासी समाजाची घरे तोडून शक्ती ग्रुप या विकसकाने वेअर हाऊसचे बांधकाम केले आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, शासकीय गुरचरण जमिनीवर वेअर हाऊस बांधताना विकसकाने सरकारची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच भूमाफियांकडून स्थानिक शेतकऱ्यांना जमिनीसाठी धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. हे अनधिकृत बांधकाम पाडून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि अनुसूचित जाती-जमाती समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष पंकज गायकवाड यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.