प्राणघातक शस्त्रांसह दोघांना अटक
प्राणघातक शस्त्रांसह दोघांना अटक
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त; उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोघा आरोपींना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून अटक केली. पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत तलवार, कोयता तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या वेळी मुख्य आरोपी आप्प्या दांडे व बंटी श्रीवास्तव हे चकवा देत फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेतील राजेंद्र थोरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की कुख्यात गुन्हेगार आप्प्या दांडे व त्याचा साथीदार बंटी श्रीवास्तव हे त्यांच्या इतर साथीदारांसह कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांना मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, विक्रम जाधव, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले, अशोक थोरवे यांचे विशेष पथक तयार करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
या पथकाने तत्परतेने धाव घेत संशयित कारचा पाठलाग करीत कुणाल कैलास गायकवाड (वय ३२, रा. बदलापूर पश्चिम) आणि अशपाक अशरफ खान (वय ३३, रा. खडवली) या दोघांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून एक तलवार, एक कोयता आणि कार असा एकूण पाच लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईदरम्यान आरोपी आप्प्या दांडे व बंटी श्रीवास्तव हे घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यांची वैद्यकीय तपासणीही केली आहे.