खोपोली-खालापुरात राजकीय घडामोडींना वेग
खोपोली-खालापुरात राजकीय घडामोडींना वेग
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी सत्तासंघर्ष तीव्र
खोपोली, ता. २० (बातमीदार) ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रशासन व निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या पातळीवर तयारी सुरू झाली आहे. पुढील तीन-चार महिन्यांत पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका एकापाठोपाठ होण्याची शक्यता असल्याने, राजकीय पक्ष व नेत्यांच्या राजकीय मोर्चे बांधणीला वेग आला आहे. खोपोली-खालापुरात शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप यांच्यात अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.
मागील महिन्यात शहरातील मान्यवर राजकीय कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यापाठोपाठ सुधाकर घारे, अंकित साखरे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी विविध पक्षातील राजकीय कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कारभारावर जोरदार टीका करून भ्रष्टाचार, मनमानी व दादागिरीसह अनेक गंभीर आरोप करून महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली. याच सभेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा व आमदार थोरवे व शिवसेनेची दादागिरी मोडीत काढा, असे आवाहन नेते सुधाकर घारे, युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, तालुका अध्यक्ष ॲड. संतोष बैलमारे यांनी कार्यकर्त्यांना केले.
...............
शिवसेना नंबर एकचा पक्ष
याच पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेना शिंदे गटाकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना नंबर एकचा पक्ष असेल, असा विश्वास व्यक्त करून त्यादृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.