आधार केंद्र बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
आधार केंद्र बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
म्हसळ्यात शिवसेना युवासेनेचे तहसीलदारांना निवेदन
श्रीवर्धन, ता. २० (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील आधार कार्ड केंद्र गेले अनेक महिने बंद असल्याने नागरिक, विशेषतः विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विविध शैक्षणिक व शासकीय कामांसाठी आवश्यक असलेले आधार अद्ययावत करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच ऑनलाइन शपथपत्र प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता ती प्रक्रिया ऑफलाइन व्हावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेतर्फे करण्यात आली आहे.
सध्या अनेक प्रशासकीय कामे तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा व्यवहार ऑनलाइन झाल्याने आधार केंद्राची सर्वांना आवश्यकता भासत आहे. त्यातच शेतीच्या कामासाठीदेखील आता आधार कार्डची गरज भासते, मात्र तालुक्यातील आधार कार्ड केंद्र अनेक महिने बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेशासाठी, शिष्यवृत्ती अर्ज, विविध स्पर्धा परीक्षा फॉर्म भरणे, शासकीय योजना जसे की महाडीबीटी, पीएम छात्रवृत्ती, आधार लिंक बँक खाते सुरू करणे, अशा अनेक आवश्यक बाबी आधार क्रमांकाशी जोडलेल्या असल्याने कामे रखडत आहेत. संबंधित आधार कार्ड केंद्रच बंद असल्याने कार्ड अपडेट किंवा दुरुस्ती करता न येण, पत्ता बदल, बायोमेट्रिक अपडेट, मोबाईल लिंक न होणे यामुळे विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी अपात्र ठरवले जात आहे. त्यामुळे या समस्येबाबत शिवसेनेने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी (ता. १८) म्हसळा तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार शेखर खोत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, तालुका संघटक कृष्णा म्हात्रे, उपतालुकाप्रमुख हेमंत नाक्ती, ज्येष्ठ शिवसैनिक नरेश विचारे, उपविभागप्रमुख राजेंद्र मोहिते तसेच माजी सरपंच रमेश खोत उपस्थित होते. आधार केंद्र लवकरात लवकर सुरू करावे व ऑनलाइन शपथपत्र प्रणालीमुळे निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता विद्यार्थ्यांची धावपळ थांबवण्यासाठी ऑफलाइन पर्याय देण्यात यावा, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
सोबत फोटो :
श्रीवर्धन : युवासेनेकडून निवेदन देताना युवासेना कार्यकर्ते.