पोलिसावर हल्ला करणाऱ्यास अटक
पोलिसावर हल्ला करणाऱ्यास अटक
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : बारच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याने पोलिस ठाण्यात आणलेल्या एका तरुणाने पोलिसालाच हातातील स्टीलच्या काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) पहाटे सीबीडी पोलिस ठाण्यात घडली. सतबिरसिंग दलजितसिंग संधू (३१) असे मारहाण करणाऱ्याचे नाव असून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव अनिकेत घाडगे असे असून ते सीबीडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तर, सतबिरसिंग संधू सीबीडी सेक्टर तीनमध्ये राहण्यास आहे. गुरुवारी (ता. १७) पोलिस नाईक अनिकेत घाडगे हे रात्रपाळीवर ठाणे अंमलदार मदतनीस म्हणून कर्तव्यावर होते. या वेळी सतबिरसिंग संधू याने सीबीडी सेक्टर-११ मधील मॅग्नम बारच्या व्यवस्थापकाशी माचिस मागण्याच्या कारणावरून वाद घातला आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर मध्यरात्रीच्या सुमारास मॅग्नम बारमध्ये बिट मार्शल पोहोचले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास संधूला ताब्यात घेऊन सीबीडी पोलिस ठाण्यात आणल्यावर तो घाडगेंच्या अंगावर धावून गेला आणि जबर मारहाण केली.