पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे लोकार्पण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे लोकार्पण
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल, ता. २० (बातमीदार) ः भिंगारी येथील पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून आज महत्त्वाचा दिवस आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. २०) कोट्यवधींच्या विकासकामांचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शिवेंद्रराजे भोसले पुढे नेत आहेत. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध विकासकामांना चालना मिळाली आहे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले.
महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यभरात विविध विकासकामांना चालना दिली जात आहे. यामध्येच पनवेल विधानसभा क्षेत्रात कोट्यवधींच्या कामांचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने ही कामे मुदतीच्या आधीच केल्याने मी अधिकाऱ्यांचे कौतुक करतो, असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.
शासकीय इमारतीला कॉर्पोरेट कार्यालयाचा लूक सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालय आपली कूस बदलत आहे, असे मत या उद्घाटनाप्रसंगी आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुण भगत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमोघ ठाकूर, भार्गव ठाकूर, पी. पी. खारपाटील, मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, दिनेश खानावकर, सुमित झुंजारराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, विचुंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद भिंगारकर, अनेश ढवळे, योगेश लहाने यांच्यासह अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.