कार्लेखिंड- सारळ पूल राज्यमार्गाची दूरवस्था

कार्लेखिंड- सारळ पूल राज्यमार्गाची दूरवस्था

Published on

कार्लेखिंड-सारळ पूल राज्य मार्गाची दुरवस्था
रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मिनीडोअरचालकांचे श्रमदान
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांसह राज्य मार्ग, ग्रामीण भागातील रस्त्यांचीही खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वेळा दुचाकीचालकांचे, मिनीडोअरचेही अपघात झाले आहेत. अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही केवळ आश्वासने देऊन स्थानिक नागरिकांसह प्रवाशांची बोळवण केली जाते. त्यामुळे अखेर कार्लेखिंड मिनीडोअर चालक-मालक संघटनेतर्फे रविवारी (ता. २०) श्रमदान करून हे खड्डे तात्पुरते भरण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्यात शासनातर्फे रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात येते; मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यामध्ये शहरी भागातील रस्ते, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गदेखील अपवाद नाहीत. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देऊन, आंदोलने करूनही तेवढ्यापुरते रस्त्यांची डागडुजी करण्यात येते, मात्र काही दिवसांनी रस्त्यांवरील खड्डे अजूनच मोठे झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारे कार्लेखिंड-सारळ पूल राज्य मार्गाची खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नुकतेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र काही महिन्यांतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे अनेकदा दुचाकीचालकांचा तोल जाऊन अपघात झाले आहेत. त्याचप्रमाणे मिनीडोअरचालकांनाही या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या त्रासाला कंटाळून अखेर कार्लेखिंड मिनीडोअर चालक-मालक संघटनेतर्फे रविवारी श्रमदान करून हे खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले आहेत. या वेळी संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील, माजी अध्यक्ष शैलेश पाटील, सदस्य वैभव वर्तक, बळवंत पाटील, अनिल पाटील यांनी सहभाग घेतला. कार्लेखिंड- सारळ पूल हा राज्य मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मिनीडोअर संघटनेच्या सदस्यांनी आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली होती. त्यांनी लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे मिनीडोअरचालकांनी सांगितले, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मिनीडोअरचालकांनी श्रमदान करून हे खड्डे बुजविले. यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
...........................
चैकट :
मे महिन्याच्या सुरुवातीला या मार्गावरील मिनीडोअर थांब्याजवळ मोरीचे काम करण्यात आले; मात्र त्यानंतर खोदण्यात आलेल्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात माती व खडी टाकण्यात आली. तेदेखील काम अर्धवट करण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, एका वेळी दोन मोठी वाहने जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे माती व खडीही वाहून गेली आहे.
..............
माणगावमधील वर्दळीचा कचेरीरोड खड्डे
माणगाव, ता. २० (वार्ताहर) ः माणगाव नगर पंचायत हद्दीतील संवेदनशील आणि नित्य वर्दळीचा असलेल्या कचेरीरोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने वाहनचालकासह नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. माणगावकरच नाही तर तालुका, जिल्हाभरातून शासकीय, शैक्षणिक कामानिमित्त अनेक जण शहरामध्ये येत असतात, मात्र मागील काही दिवसांपासून रस्‍त्‍यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्‍था झाली असताना माणगावमधील अंतर्गत रस्‍त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावत असून, त्‍याचा फटका माणगावकरांना बसत आहे. त्‍यातच शहरातील प्रसिद्ध असलेल्या कचेरीरोडवर खड्डे पडले असून, त्‍याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com