थोडक्यात नवी मुंबई
वास्तु विहारसह सेलिब्रेशन गृह संकुल परिसरात हायमास्ट दिवे
खारघर (बातमीदार) : खारघरमधील वास्तू विहार आणि सेलिब्रेशन गृहनिर्माण सोसायटी परिसरात पालिकेकूडन हायमास्ट दिवे लावण्यास येत आहे. यामुळे रहिवाशी समाधान व्यक्त करीत आहेत. खारघर सेक्टर १६ वास्तुविहार गृहसंकुलामध्ये मागील काही दिवसात अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडल्या आहेत. परिसरात खाडीकिनारा असल्यामुळे चोरट्यांना सहज पळता येते. त्यामुळे महापालिकेने संबंधित विभागात दिवाबत्तीची सोय करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याअनुषंगाने माजी नगरसेविका संजना कदम यांनी पालिकेने परिसरात हायमस्ट दिवे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन पालिका प्रशासनाने सेक्टर १६ वास्तुविहार, सेक्टर १७ सेलिब्रेशन गृहनिर्माण परिसरात हायमास्ट दिवे उभारणीचे काम सुरू केले आहे.
....................
पालिकेतर्फे स्वच्छताकर्मीकरिता योग, व्यसनमुक्ती शिबिर
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत नवी मुंबईतील स्वच्छता कार्याला अधिक प्रभावीपणे गतीमानता आलेली आहे. त्यानुसार ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानअंतर्गत ऐरोली सेक्टर तीन येथील विभाग कार्यालयाजवळील समाजमंदिरात स्वच्छतादूत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ऐरोली विभागाचे विभाग आधिकारी सुनील काठोळे तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या पुढाकारातून ईएचएस शिक्षा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित योग शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐरोली विभागातील स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखी यांनी घेतला. योग अभ्यासक गव्हाणे यांनी मानसिक ताण-तणाव व योगचिकित्सा याची सांगड घालत दररोजच्या जीवनातील योगाभ्यासाचे महत्त्व सांगून सोपे योगप्रकार करून घेतले व आरोग्य जपणुकीच्या दृष्टीने दररोज थोडा वेळ काढून ते नियमितपणे करण्यास सांगितले. अशाच प्रकारे बेलापूर विभागात विभाग आधिकारी डॉ. अमोल पालवे आणि स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांच्या माध्यमातून स्वच्छताकर्मींसाठी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही व्यसनामुळे स्वत:च्या आरोग्याची हानी होते, तसेच कुटुंबाची वाताहत होते. असे अनेक उदाहरणे सांगत, पटवून देत स्वच्छताकर्मींमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. यावेळी सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) स्वच्छताकर्मींना पावसाळी रेनकोटचे वितरण करण्यात आले.
............
पालकर चौकाला पार्किंगचा विळखा; कारवाईची मागणी
जुईनगर, ता. २० (बातमीदार) : नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पार्किंग समस्या डोकेदुखी ठरत आहे. प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. मैदाने, मोकळे भूखंड आणि उड्डाणपुलाखालील जागादेखील पार्किंगसाठी वापरण्यात येत आहेत. अशाच प्रकारे जुईनगर आणि नेरूळच्या मधोमध असलेल्या रस्त्यातील पालकर चौकाच्या भोवती अवैध पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे जुईनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होत आहे. शिवाय चौकात वाहतूक कोंडी होत आहे.
नेरूळ येथून जुईनगरमध्ये प्रवेश करताना मुख्य रस्त्यावर असणाऱ्या पालकर चौकाला पार्किंगने वेढल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. सार्वजनिक उद्यान समोरील चौकात मध्यभागी उच्च विद्युत वाहिनीच्या खांबाभोवती बांधकाम करून नागरिकांच्या जीवाचा धोका कमी करण्यात आला आहे. शिवाय नवी मुंबई महापालिकेने या चौकाचे माणिकराव बंडोबा पालकर नामकरण करून फलकदेखील लावला आहे. नेरूळ, जुईनगर आणि पामबीच मार्गावरून येणारी वाहने या चौकात एकत्र येतात. दरम्यान चौकाला वळसा घालून वाहनांची प्रवास सुखकर होतो. मात्र गेल्या काही महिन्यापासून चौकाच्या भोवतालीच अनधिकृत वाहने पार्क केली जात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिस या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने परिसरात नाराजी पसरली आहे. त्वरित येथील पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
............
स्पर्धा परीक्षेतील यशस्वी प्रीती खंडागळे यांचा सन्मान
तुर्भे (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी विभाग परीक्षेत यशस्वी ठरलेल्या प्रीती अनुप साळुंखे खंडागळे यांचा सन्मान करण्यात आला आहे. सत्कार कार्यक्रम दिवा नाका येथील राज्यश्री शाहू महाराज शाळेच्या सभागृहात पार पडला. यावेळी माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक संजू वाडे, रवी धावरे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रीती यांना हे यश सहजासहजी मिळालेले नाही, त्यांना यशाने अनेकदा हुलकावणी दिली. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१३, १६ व २०२१ अशा तब्बल तीन वेळा मुलाखती दिल्या. शेवटी अतोनात कष्टाचे चीज झाले आणि २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या दोन जुलै रोजी जाहीर झालेल्या राज्य सेवा आयोगाच्या निकालात त्यांना यश मिळाले. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सहाय्यक अभियंता म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य विभागातून बीई पदवी प्राप्त केली. त्यानंतर भारती विद्यापीठ, मॉडर्न कॉलेज अशा विविध संस्थेच्या ठिकाणी लेक्चरर म्हणून काम केले आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला होता.
............
नेरूळमध्ये सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धे उत्साहात
वाशी (बातमीदार) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याअंतर्गत होणाऱ्या सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन नवी मुंबई महापालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरूळ सेक्टर १९ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उत्साहात प्रांरभ करण्यात आला. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत १५, १७ वर्षाआतील मुले आणि मुलींच्या संघांना प्रवेश देण्यात आला आहे. या अनुषंगाने १५ वर्षाअंतर्गत मुलांमध्ये ३६ संघ, तर १७ वर्षाअंतर्गत मुलांमध्ये ३८ संघ आणि १७ वर्षाअतर्गंत मुलींमध्ये २३ संघ अशा एकुण ७९ संघांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेतून विजयी होणारा संघ पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. हा संघ यापुढच्या स्तरावरील स्पर्धेत नवी मुंबई महापालिका जिल्ह्याचा संघ म्हणून मुंबई विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विजेता संघ हा विभागात व राज्यस्तरावर विजयी झाला तर पुढील राष्ट्रीय स्पर्धेत संघाला खेळण्याची संधी मिळणार आहे.
.........
चौथीपर्यंतच्या शिक्षकांना इंग्रजी अध्यापनाचे प्रशिक्षण
नेरूळ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीवर भर देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. १५ व १६ जुलै रोजी नवी मुंबई महापालिका शाळा तसेच अनुदानित शाळा यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या मराठी माध्यमातील शिक्षकांचे इंग्रजी भाषा विषयक प्रशिक्षण नवनीत फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणामध्ये नवनीत फाउंडेशनचे बसंती रॉय व डॉ. भारती हजारी यांनी शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाबद्दल सखोल माहिती दिली. तसेच दीपल कांबिरी व नीलम आजगावकर यांनी शिक्षकांना प्रत्यक्ष भाषा शिक्षणविषयक मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून बोलण्यासाठी आत्मविश्वास वाढावा, याकरता शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये अध्यापन विषयक गटकार्य देण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना संभाषण कृती व भाषिक खेळाच्या माध्यमातून इंग्रजी भाषा कशी शिकवावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीचीही माहिती देण्यात आली. प्रशिक्षणामध्ये प्रत्येक शिक्षकाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नवनीत फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षणात सहभागी प्रत्येक शिक्षकाला अभ्यासासाठी संच देण्यात आले. विद्यार्थ्यांना शिकविताना इंग्रजी विषयाचे अध्यापन खेळाच्या माध्यमातून हसत खेळत मनोरंजनाव्दारे कसे प्रभावी करता येईल याबद्दल दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. रोजच्या दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक्त एक वेगळा अनुभव या प्रशिक्षण वर्गातून मिळाला, अशा प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.