एसटीचे स्मार्टकार्ड आगारात धूळखात

एसटीचे स्मार्टकार्ड आगारात धूळखात

Published on

एसटीचे स्मार्ट कार्ड आगारात धूळखात
तांत्रिक बिघाडामुळे वापरण्यात अडचणी
अलिबाग, ता. २२ (वार्ताहर) ः एसटी महामंडळाने कागदी ओळखपत्राच्या जागी प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याची योजना सुरू केली होती, परंतु ही योजना बारगळी असून, तयार केलेले असंख्य स्मार्ट कार्ड रायगड जिल्ह्यातील एसटी बस आगारातील आरक्षण कक्षात धूळखात आहेत. त्यामुळे स्मार्ट कार्डऐवजी जुन्याच ओळखपत्राचा आधार घेत नागरिकांचा प्रवास सुरू आहे.
ज्येष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे एसटीची सवलत मिळते. त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटीची सवलत दिली जाते. तसेच नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह सात दिवस, १४ दिवस कुठेही प्रवास योजनेसाठीदेखील एसटीचे पास मिळतात, मात्र लाभार्थ्‍यांना मिळणारे सवलत पास हे कागदी स्वरूपात असल्यामुळे पावसाळ्यात भिजून खराब होण्याबरोबरच गहाळ होण्याची भीती असल्‍याने नऊ वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकातील आरक्षण कक्षात स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. एसटीच्या स्मार्ट कार्डच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली. तसेच, एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य पासधारक प्रवाशांनाही स्मार्ट कार्ड देण्यात येत होते, मात्र दोन वर्षांपासून स्मार्ट कार्ड योजनाच बंद पडली आहे. ज्या कंपनीकडून स्मार्ट कार्ड दिले जात होते, त्या कंपनीला खर्च परवडत नसल्याने त्यांनी काम थांबविल्याची चर्चा एसटी महामंडळात सुरू आहे. त्यामुळे एसटीची स्मार्ट कार्ड योजना बारगळल्‍याचे दिसून येत आहे.

नूतनीकरण रखडले
२०१६ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू झाली. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व अन्य पासधारकांचे ‘स्मार्ट’ ओळखपत्र बनले. ते ओळखपत्र स्कॅन केल्यावर मशीनमध्ये नोंदणी केली जात होती. ज्या कंपनीला स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम दिले होते, त्याच कंपनीने तांत्रिक बिघाड असल्याचे कारण दिले आहे. सर्व्हरची समस्या असल्‍याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना नव्याने स्मार्ट कार्ड काढण्यापासून मुदत संपलेल्या स्मार्ट कार्डचे नूतनीकरणही रखडले आहे.

आधार कार्डद्वारे एसटी सवलत
स्मार्ट कार्ड योजना सरकारची असून, दोन वर्षांपासून बंद झाली आहे. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डद्वारे एसटीतून प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. सध्या जुन्याच पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना असल्‍याचे एसटी महामंडळाचे रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com