रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा :

रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा :

Published on

रायगडला अवकाळी पावसाचा तडाखा :
कापणीच्या उंबरठ्यावरचे भातपीक पाण्याखाली
शेतकरी आर्थिक संकटात; तातडीने मदतीची मागणी
पोलादपूर, ता. २५ (बातमीदार) ः तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. ऐन कापणीच्या मोसमात ओल्या दुष्काळामुळे भातपिके पाण्याखाली गेली असून बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. भाताच्या लोंब्यांना आणि वड्यांना आलेले पीक आता झुकले असून उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुका डोंगराळ प्रदेश असल्याने पर्जन्यमानाचा थेट परिणाम येथील शेतीवर होत असतो. यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले होते. परंतु अचानक सुरू झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेतात पाण्याचे डबके निर्माण झाले आहे. काही क्षेत्रांमध्ये तर पिके अक्षरशः बुडून गेल्याने दर्जाही खालावणार असून या परिस्थितीने शेतकरी चिंतेत आहे. अगोदरच खतांच्या किमती, मजुरीचा खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच पावसाने दिलासा न देता नवे संकट ओढवले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आमच्या डोळ्या समोर कष्टाचे पीक तयार होते; पण या अवकाळीने पाणी फेरले. मदत न मिळाल्यास दिवाळी काळोखात जाईल, असे शेतकऱ्याने सांगितले.
...........................
पोयनाड परिसरातील शेतकरी हवालदिल; पंचनाम्याची मागणी
पोयनाड, ता. २५ (बातमीदार) : अवकाळी पावसाने दोन दिवस जोरदार हजेरी लावल्याने पोयनाड व खारेपाट परिसरातील भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे.
पोयनाड आणि आजूबाजूचा खारेपाट परिसर हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात. मात्र आता कालांतराने हवामानाचे चक्र आणि पावसाचे प्रमाण बदलत गेल्याने भाताचे उत्पन्न घटत गेले. आता जे शेतकरी पोयनाड परिसरात भाताची शेती करतात त्याला अवकाळीचा मोठा फटका बसला असून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. यंदाच्या दिवाळीत हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार पाऊस सायंकाळच्या सुमारास जोरदार बरसला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. दिवाळीत प्रामुख्याने भात कापणीला सुरुवात होते. ही भाताची कापणी झाल्यानंतर त्यांचे भारे बांधून ठेवले जातात आणि त्यानंतर झोडपणी आणि मळणी केली जाते. पण दिवाळीत १७ तारखेपासून दररोज मुसळधार पाऊस बरसत असल्याने संपूर्ण भाताचे पीक भिजले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. ३ ते ४ दिवसांपासून केलेल्या मेहनतीवर अवकाळीने पाणी फेरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
................
चौकट :
- पंचनामा आणि नुकसानभरपाईची मागणी
पोयनाड परिसरातील पेझारी, चरी, कोपर, शहापूर, धेरंड, शहाबाज, कुर्डुस, सांबरी, वाघोली या भागात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीमध्ये पाणी साचले. त्‍यामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत व तातडीने नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
..............
बदलत्या हवामानाचा परिणाम
पोयनाड आणि खारेपाट परिसर हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. मागील काही दिवसांपासून या परिसरात बदलत्या हवामानाचा परिणाम भातशेतीवर दिसून येत आहे. सकाळच्या वेळेस थंडी, दुपारच्या सुमारास ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस अशा परिस्थितीचा भातपिकावर परिणाम दिसून येत आहे.
................
पेणमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान
पेण, ता. २५ (वार्ताहर) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने नुकसान केले आहे. या परतीच्या पावसाने राज्यातील बळीराजा पुर्णतः उद्ध्वस्त होत असताना पेण तालुक्यातील शेतीचेसुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने वेळीच शेतकऱ्यांना मदत देऊ करावी, जेणेकरून मदतीमुळे येथील येथील शेतकरी तग धरून राहणार आहे, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्यात यावर्षी कोकणासह विदर्भ, मराठवाडा या भागांमधील शेतीला चांगले पीक आले होते. त्यामुळे शेतकरी सुखावला होता; मात्र मागच्या मेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही जाण्याचे नाव घेत नसून मागील चार ते पाच दिवसात परतीच्या पावसाने पुन्हा राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांसह पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पेण तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कापणीला सुरुवात केली खरी, मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी माजी सरपंच गोरखनाथ पाटील यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे खारेपाटातील शेतीचे नुकसान झाले आहे. त्याबाबत पुढच्या महिन्यात अधिक नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून पाठविण्यात येतील. शासनाकडून शेतकऱ्यांना तत्काळ मदत कशी मिळेल याबाबत कृषी विभाग प्रयत्नशील आहे, असे कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले.
..............
खोपोली साजगाव यात्रेवरही पावसाचे सावट
खोपोली, ता. २५ (बातमीदार) ः दिवाळी हंगामानंतर शेतकरी कापणीच्या तयारीत असतानाच परतीच्या पावसाने खोपोली-खालापूर परिसरात प्रचंड नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह कोसळत असलेला मुसळधार पाऊस शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. त्‍यातच येत्‍या २ नोव्‍हेंबरपासून सुरू होणाऱ्या साजगावच्या यात्रेवर पावसाचे सावट दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून थोडा दिलासा मिळला होता. अनेक शेतकऱ्यांनी संधी साधून कापणी सुरू केली होती. परंतु बुधवारी अचानक पावसाने तडाखा दिल्याने शेतात पाणी साचले असून भाताचे झुकलेले व ओलसर झालेले पीक कुजण्याच्या मार्गावर आहे. कोंब फुटण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्‍यातच २ नोव्हेंबरपासून सुरू होणारी प्रसिद्ध कार्तिकी एकादशीची साजगाव यात्रा १५ दिवस चालते. मात्र पावसाचे अंदाज कायम असल्याने यात्रेतील गर्दी, व्यवहार आणि कार्यक्रमांवर परिणाम होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकरी दत्तात्रय दिसले यांनी सांगितले की, कापणीसाठी मजूर जुळवले असतानाच पावसाने हजेरी लावल्याने आमच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
.....................
तळ्यात शेतकरी दुहेरी संकटात
वन्य प्राण्यांचा धुडगूस दुसरीकडे पावसाची हजेरी
तळा, ता. २५ (बातमीदार) ः कोकणातील भातशेती व मत्स्यव्यवसाय हा पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला मुख्य उदरनिर्वाहाचा मार्ग आहे. परंतु बदलत्या काळात हवामान आणि पर्यावरणात झालेले नाट्यमय बदल शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहेत.
एप्रिलपासूनच सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे वैरणीचे नुकसान झाले. त्यातच बागायती व कोरडवाहू शेतीवर वाईट परिणाम झाला. शिवाय पर्वतरांगांमधील जंगले वाढत असल्याने रानडुक्कर व माकडांसारख्या वन्य प्राण्यांचे शेतांवरील आक्रमण वाढले आहे. या हल्ल्यांमुळे पिकांचे तुडवणे, उपटणे आणि नासधूस वाढली आहे. यंदा भातपिके भरघोस आली होती; पण अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी पुन्हा नुकसानाच्या खाईत ढकलले गेले आहेत. पिके भिजल्याने गुणवत्तेसह, उत्पादन घटण्याबरोबर बाजारमूल्य कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
........
कुणबी समाजाची मागणी
तळा तालुका कुणबी समाज अध्यक्ष यशवंत शिंदे यांनी सांगितले की, नैसर्गिक संकट व वन्य प्राण्यांचा धुडगूस या दुटप्पी समस्येचा शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी. कोकणातील तुकड्यात विभागलेली जमीन, मजूर टंचाई, वाढते खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी उद्योगातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे, अशी खंत त्‍यांनी व्यक्त केली.
.............................
६ परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण
म्‍हसळा, ता. २५ (बातमीदार ) - परतीच्या पावसामुळे म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले असून सर्वत्र नाराजीचे सावट असून शासनाने त्वरित भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहॆ.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने हिसकावून घेतला आहॆ.तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केवळ भातशेतीवरच अवलंबून असून उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने शेतकऱ्यांपुढे एक आव्हान उभे आहॆ.अगोदरच बी. बियाणे, अवजारे आणि वाढती मजुरी यामुळेही हवालदिल झालेला तालुक्यातील शेतकरी शासनाच्या मदतीची चातकासारखा वाट पहात आहॆ.यावर्षी भातशेती उत्तम प्रकारे झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण होते, परंतू परतीच्या पावसाने अचानक दगा दिल्याने फार मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहॆ.
सोबत फोटो आहॆ
................
तत्काळ पंचनाम्यासह नुकसानभरपाईची मागणी
म्‍हसळा, ता. २५ (बातमीदार) : परतीच्या पावसाने म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने हिसकावून घेतल्याने दिवाळीचे समाधान, आनंद आणि उत्साह यावर गालबोट लागले आहे. भातशेतीवर संपूर्णपणे अवलंबून असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक गाठ आधीच सुटली असताना पावसाने त्यांच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. शेतकरीवर्ग सर्वत्र नाराजी व्यक्त करीत असून शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण आणि वातावरण शेतीस पोषक असल्याने भातपीक जोमात आले होते. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून, तसेच उच्च प्रतीचे बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि वाढत्या मजुरीचा भार सोसून शेती उभी केली होती. परंतु परतीच्या पावसाने अचानक दगा देत अनेकांच्या कापणीसाठी तयार असलेल्या भातपीकाचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यात बुडलेले शेत आणि कोसळून गेलेली पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे. म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भातशेतीवरच आधारित असल्याने पिकाचे होणारे नुकसान म्हणजे त्यांच्या रोजीरोटीवर थेट घाला असल्याचे सांगितले. पर्यायी उद्योग नसल्याने हंगामाच्या कमाईवरच त्यांचे दिवाळी आणि वर्षभराचा आर्थिक बोजा व्यवस्थापित केला जातो. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीऐवजी काळोख पसरला आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देणारी कार्यवाही करावी. पंचनामे जलदगतीने करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी. अन्यथा मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक संकटात सापडतील, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी केली आहे. शासनाकडून हवामानातील बदल, अनियमित पाऊस यामुळे शेती क्षेत्र संकटात सापडल्याचे मान्य करून तत्पर मदत करण्यात यावी, अशी अपेक्षा शेतकरीवर्गाने व्यक्त केली आहे. यंदाची दिवाळी आनंदापेक्षा तणाव आणि दु:खाने व्यापली गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com