प्राध्यापक भरती : कुलपती बदलताच भरतीची निकषही बदलले
प्राध्यापक भरतीचा घोळ
---
कुलपती बदलताच भरतीच्या निकषातही बदल
मुलाखतीच्या निकषांनी संस्थाचालकांची अडचण
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेसाठी राज्यपाल तथा कुलपतींच्या कार्यकाळनिहाय गुणांकनाच्या सूत्रात बदल करण्यात आले. या बदलांमुळे तब्बल तिसऱ्यांदा देण्यात आलेल्या आदेशानंतरही मागील दीड वर्षांत विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये भरती प्रक्रिया नीट सुरू होऊ शकली नाही. यामुळे राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर मोठे परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
२६ नोव्हेंबर २०२४ रोजी तत्कालीन कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी काही गैरप्रकारांच्या तक्रारींवरून भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निकषांच्या सूत्रांमध्ये काही बदल करून २७ फेब्रवारी २०२५ रोजी भरती करण्याचे आदेश कुलपतींनी दिले होते. त्यात पूर्वानुभव, शैक्षणिक पात्रता, अध्यापन क्षमता आदींसाठी ८० गुण आणि मुलाखतीसाठी २० गुण ठेवण्यात आले होते; मात्र त्यातही काही जाचक अटी असल्याचे सांगत विद्यापीठे आणि संस्थांचालकांनी प्राध्यापक भरती सुरू केली नव्हती. दरम्यानच्या काळात नवे कुलपती तथा राज्यपाल आचार्य देवव्रत आल्यानंतर नेमण्यात आलेल्या समितीने प्राध्यापक भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेला ७५ आणि मुलाखतीसाठी २५ गुणांचे सूत्र ठरविले. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ६ ऑक्टोबर रोजी भरती प्रक्रियेसाठी आदेश जारी केला; मात्र त्यातील जाचक अटींमुळे एकाही विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी भरती सुरू केली नाही. नव्या अटींमध्ये सुधारणा केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत भरती प्रक्रिया सुरू न करण्याची भूमिका विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी घेतल्याने राज्य सरकारला लवकरच यामध्ये हस्तक्षेप करावा लागणार असल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
---
किती पदे भरली जाणार?
राज्यातील अकृषी, अनुदानित, अभिमत अशा एकूण १५ विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या ६५९ जागा भरल्या जाणार आहेत. यात सर्वाधिक १३६ पदे मुंबई विद्यापीठात असून त्याखालोखाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १११, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर ९२, एसएनडीटी ७८ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ७२ जागा भरल्या जाणार आहेत. दुसरीकडे महाविद्यालय स्तरावरील ३१ हजार १८५ रिक्त पदांपैकी दोन हजार ८८ हून अधिक पदे भरली जाणार आहेत. यात काही महाविद्यालयांमध्ये मुलाखतींपर्यंतची प्रक्रिया पूर्ण केली, तर काहींच्या नियुक्त्याही झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
–
संस्थाचालकांचे दबावतंत्र
६ ऑक्टोबरच्या भरती प्रक्रियेतील आदेशात उमेदवारांच्या मुलाखतीसाठी २० गुण देण्यात आले. शिवाय भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनकॅमेरा मुलाखती आणि गुणवत्ता यादीच्या अटी टाकण्यात आल्याने संस्थाचालकांच्या अडचणी वाढल्या. मुलाखतींसाठी त्यांना अधिक गुणांची सवलत तसेच अधिकार हवे आहेत. यामुळे संस्थाचालकांच्या एका गटाने ही भरती प्रक्रिया रोखून धरण्यासाठी दबावतंत्र सुरू केले असल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
–
नव्या आदेशाचे स्वागत
प्राध्यापक भरती प्रक्रियेत संस्थाचालकांकडे कमीत कमी अधिकार देण्याच्या नव्या आदेशाचे अनेक प्राध्यापकांनी स्वागत केले. भरतीवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मुलाखतीचे गुण आणखी कमी करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. २७ फेब्रुवारीला दिलेल्या भरतीच्या आदेशातील गुणवत्ता यादी त्याच दिवशी संकेतस्थळावर जाहीर करण्याचे नियम, ऑनकॅमेरा मुलाखतीही पुन्हा लागू करण्याची गरज असल्याचे मत एमफुक्टोचे माजी उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

