बातम्या थोडक्यात
पालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तुर्भेकरांचा जीव धोक्यात !
तुर्भे (बातमीदार) ः तुर्भे सेक्टर २१ येथील उद्यान विभागाच्या ठेकेदाराने ऐन दिवाळीच्या तोंडावर झाडांची छाटणी केली, मात्र छाटलेल्या फांद्या मैदानात आणि फुटपाथवर टाकल्या आहेत. या फांद्यांमुळे मुलांना खेळण्याची जागा अडवली जात असून जळत्या फटाक्यांमुळे आगीची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी तक्रार करूनही उद्यान सहाय्यक, अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नाही. या भीतीच्या सावटाखाली वाहनांची पार्किंग आणि मुलांचे खेळ सुरक्षित नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तुर्भे सेक्टर २१ येथे उद्यान विभागाच्या ठेकेदाराने ऐन दिवाळीच्या तोंडावर येथील मैदानातील झाडांची छाटणी केली आहे. छाटणी केलेल्या फांद्या येथील मैदानामध्ये अस्ताव्यस्त टाकल्या आहेत. इतकेच नव्हे तर फुटपाथवर देखील या फांद्या टाकण्यात आल्या आहेत. या परिसरातील मुलांना दिवाळीची सुट्टी लागून आठवडा उलटला आहे. मात्र मैदानामध्ये सर्वत्र झाडांच्या फांद्या आणि डेकोरेटरचे साहित्य पडलेले आहे. त्यामुळे मुलांना खेळण्याकरिता मैदान उपलब्ध न झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. वृक्ष छाटणी होताच त्या फांद्या एक-दोन दिवसात उचलून क्षेपणभूमीवर नेण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते; मात्र ठेकेदाराने वेळेवर काम न केल्याने त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी तुर्भे विभाग अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
...................
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी दिवाळी
वाशी (बातमीदार) ः दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि एकात्मतेचा सण. मात्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या आनंदाचा प्रकाश पोहोचावा, हा खरा उत्सवाचा अर्थ आहे. त्याच भावनेतून ‘नवी मुंबईकर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ऐरोली विधानसभेचे शिवसेना (शिंदे गट) सहसंपर्क प्रमुख अॅड. रेवेंद्र पाटील आणि विशेष कार्यकारी अधिकारी वैशाली पाटील यांनी या वर्षीही स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा खास उपक्रम राबवला. दरवर्षी सातत्याने चालणारा हा सामाजिक उपक्रम ऐरोली नाक्यावरील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडला. शहराच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे तेज झळकावे, यासाठी पाटील दाम्पत्याने पुढाकार घेतला. या उपक्रमात सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले, तर पुरुष कर्मचाऱ्यांना नवीन कपडे देण्यात आले. महिलांसाठी खास साड्यांची भेट देऊन त्यांची दिवाळी अधिक रंगतदार बनवली. कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधत त्यांच्या समस्या, गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी अॅड. रेवेंद्र पाटील यांनी सांगितले की, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच आपले शहर सुंदर, स्वच्छ आणि आरोग्यदायी राहते. त्यांच्या कष्टाचे मोल शब्दांत मांडता येणार नाही. म्हणूनच दरवर्षी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे ही आमची परंपरा बनली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी वैशाली पाटील यांनीही माणुसकीचा संदेश देत सांगितले की, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मान आणि आपुलकीची भावना देणे ही समाजाची जबाबदारी आहे. आपण जर त्यांच्या चेहऱ्यावर थोडे हसू फुलवू शकलो, तर तीच खरी दिवाळी असल्याचे त्यांनी सांगितले.
..................
‘भव्य दिवाळी संध्या’त सुरसंगीताचा जल्लोष
वाशी (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर ९, दिवागाव येथे समाजसेवक भाई केणी यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना प्रणीत भव्य दिवाळी संध्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘सुरसंगीत ऑर्केस्ट्रा’च्या माध्यमातून परिसर मंत्रमुग्ध झाला. सुमधुर गाणी, भक्तिगीते आणि दिवाळीच्या उत्सवी वातावरणात रसिक प्रेक्षकांनी संगीताचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमात गणेशोत्सव काळात घेण्यात आलेल्या मखर सजावट स्पर्धेच्या विजेत्यांचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रभागातील आणि दिवागावातील १०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेतली गेली. महिलांसाठी विशेष आकर्षण ठरली लक्की ड्रॉ पैठणी साडी स्पर्धा, ज्यामध्ये अनेक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमास शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून समाजसेवक भाई केणी यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला माजी नगरसेवक ममित चौगुले, नगरसेविका नंदा काटे, तसेच मोरेश्वर केणी, यशवंत पाटील, मदन नाईक, मदन केणी, बाबजी मढवी यांसह प्रभागातील ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुलसीदास लक्तर, दीपा वक्कर, छबीताई जाधव, दीपा काळे, आश्विनी नाईक आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभागातील स्वच्छता दूतांचा देखील सत्कार करून त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
.............
सिडकोतर्फे कर्तव्यदक्ष सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान
तुर्भे (बातमीदार) ः दिवाळीच्या निमित्ताने सिडको महामंडळात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या सुरक्षा सहाय्यक, सुरक्षा पर्यवेक्षक, मुख्य सुरक्षा रक्षक आदींनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल गौरविण्यात आले. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सन्मानपत्र देऊन २३ सुरक्षाकर्मींचा सन्मान केला. यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी किसन गायकवाड उपस्थित होते. २५ सप्टेंबर रोजी ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे गाडीने प्रवास करताना नकळत पालकांच्या हातून दोन वर्षाची मुलगी निसटली होती. यावेळी सुरक्षा रक्षक सचिन घरत, अनिल जाधव आणि महिला सुरक्षा रक्षक प्रियंका देशमुख यांनी कर्तव्यावर दाखविलेल्या सतर्कतेमुळे ही मुलगी आई, वडिलांना सुखरूपपणे मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. २०२५ या वर्षात सिडकोने खारघर, उलवे, कळंबोली, कामोठे, पनवेल व द्रोणागिरी नोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात अवैध डंपिंग विरूद्ध गस्त व भरारी पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल सुरक्षा साहाय्यक रमेश वेदांते, सुरक्षा पर्यवेक्षक लक्ष्मण देवडकर, रंजित शिवणगेकर, आत्माराम इंगोले, नितीन दामगुडे आणि मुख्य सुरक्षा रक्षक विनोद शेवाळे, आजिनाथ शेकडे, नीलेश जाधव, प्रकाश खेमणार, यशवंत पाटील, प्रवीण पाटील, अतुल कांबळे, योगेश काटकर, जगदीश परसणे, लोकेश जाधव तसेच रायगड जि. सु. मंडळाचे चेतन पाटील, सतीश भोपी, मेघश्याम देसाई, शेखर कोळी, रोशन कोळी यांना सिडकोतर्फे गौरविण्यात आले.
.......
खारघरमध्ये वाहनतळ उपलब्ध करून देण्याची मागणी
खारघर (बातमीदार) : खारघर परिसरात वाहनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या केला जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालिका आणि सिडकोने खारघरमध्ये भूखंड उपलब्ध करून नियोजित वाहनतळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांनी पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासनाकडे केली आहे. खारघरच्या वाढत्या विकासामुळे निवासी संकुलाची तसेच व्यवसाय करणाऱ्या व्यापारिवर्गाची वाढ होत आहे. त्यात घरोघरी वाहने झाली आहे. इमारतीच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावर वाहने उभी केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या शिवाय खारघरमध्ये असलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे अडचण निर्माण झाली आहे. तसेच सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, इस्कॉन मंदिर आणि पांडवकडा धबधबा येथे वाढलेल्या पर्यटकांमुळे पार्किंगची समस्या तीव्र झाली आहे. रस्त्यांच्याकडेला अनधिकृत वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. खारघरमधील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहन समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन खारघर परिसरात वाहनतळासाठी भूखंड उपलब्ध करून नियोजित वाहनतळ उपलब्ध करून दिल्यास रस्ते मोकळे राहतील आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
...........
दिवाळीत घरफोड्यांसह दरोडे रोखण्यात पोलिसांना यश
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पनवेल परिसरात दरवर्षी दिवाळी उत्सवापूर्वी आणि नंतर घरफोड्या, दरोडे आणि चोरीच्या घटनांचा धोका वाढतो. सुमारे सात लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात नागरिकांच्या घरसुरक्षेची चिंता सतत राहते. यंदा पोलिसांनी दीपोत्सवाच्या महिनाभर आधीच नियोजनबद्ध काम हाती घेतल्याने गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पनवेल शहरासह खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, तळोजा, खारघर आणि उरण पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवले. पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, साहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब ढोले व सहायक पोलिस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेतल्या गेल्या. प्रत्येक ठाण्यांतर्गत गुन्हेगारांचे मोबाईल नंबर जीपीएसशी जोडण्यात आले, ज्यामुळे कोणत्या वेळी कोणता गुन्हेगार कुठे आहे, याची माहिती सहज मिळली. गस्त व कारवाई सक्रिय करत चोरटे कारागृहात ठेवण्यात आले. पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्यामुळे अनेकांनी शहरातून मुक्काम हलवला. गस्त नियमित ठेवण्यात येत असून, पोलिसांच्या प्रत्येक हालचालीचा अहवाल पोलिस आयुक्तांकडे पाठवला जात आहे. जर पोलिसांच्या गस्ती वाहनांमध्ये तांत्रिक अडचण आली, तर तत्काळ दुसरी गाडी उपलब्ध करून गस्त सुरळीत ठेवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जीपीएस आधारित गस्त दरम्यान संशयास्पद व्यक्तींची विचारपूस केली जाते. घरफोड्या व चोरी टाळण्यासाठी नागरिकांना काय उपाययोजना कराव्यात, याबाबत शहर व ग्रामीण भागात जनजागृती बैठका घेतल्या जात आहेत. पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले की, या नियोजनबद्ध कारवाईमुळे यंदा दिवाळीत चोरी व दरोडे रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

