थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन
अलिबाग (वार्ताहर) ः युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरा जपणे तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव देत राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे, या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन बुधवारी (ता. २९) करण्यात आले आहे. या महोत्सवात युवकांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (गट), लोकगीत (गट), कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञानदर्शन) या उपक्रमांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती तसेच युवा मंडळांनी २८ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वाजेपर्यंत आपली ऑनलाइन नोंदणी dscraigad.२००९@rediffmail.com या ई-मेलद्वारे करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले आहे.
.................
बाहे-देवकान्हे येथील महिलांना दिले स्वयंरोजगाराचे धडे
रोहा ता. २६ (बातमीदार) ः तालुक्यातील कृषिनिष्ठ बाहे गाव व देवकान्हे गावातील महिलांनी स्वतःचा व्यवसाय करून त्यांनी स्वयंरोजगार करावा, यासाठी शिलाई मशीन व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच यशस्वीपणे पार पडला. रेस्टी स्टार स्वयंरोजगार संस्था अलिबाग यांच्या वतीने व बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे रोशन पाटील व अनिता मोरे यांनी या प्रशिक्षण शिबिरात महिलांना सर्वोत्तम मार्गदर्शन केले. सलग २० दिवसांहून अधिक दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात बाहे व देवकान्हे गावातील विविध बचत गटातील सुमारे ९० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या शिबिरात कापडापासून उशी कव्हर, पेन पाऊच, हात पिशवी, हातरूमाल आदींसह अन्य कापडकाम शिकविले. रेस्टी स्टार स्वयंरोजगार संस्था, अलिबाग यांच्या वतीने व बँक ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिराचा आम्हा महिलांना चांगला फायदा झाला असून, या प्रशिक्षणाची माहिती व ज्ञानाचा उपयोग आमच्या बचत गटांसाठी व वैयक्तिक पातळीवर करून स्वयंरोजगार निर्माण करणार असल्याची माहिती येथील महिला प्रतिनिधी स्वाती ठाकूर व मिनाक्षी थिटे यांनी दिली.
..........
खांब येथून पंढरपूरकडे पायी वारी दिंडीचे प्रस्थान
रोहा (बातमीदार) ः दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खांब ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा २० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत खांब येथून २० ऑक्टोबर रोजी पायी दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे करण्यात आले आहे. स्वा. सु. अलिबागकरबाबा, गोपाळबाबा वाजे व धोंडूबाबा कोलाटकर यांच्या आशीर्वादाने ह.भ.प. कृष्णा महाराज जाधव, नडवली यांनी ही पायी दिंडीची परंपरा चालू केली असून, त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली पायी दिंडी नडवली-खांब येथून २० ऑक्टोबर रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. या दिंडी सोहळ्यात रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध भागातून मोठ्या संख्येने वारकर-यांनी सहभाग घेऊन पायी वारीचा आनंद घेतला. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. नामदेव महाराज यादव, मारूती महाराज कोलाटकर, प्रकाश थिटे, सदानंद जाधव, कृष्णराम धनवी, एकनाथ मरवडे, गणेश जाधव, ज्ञानेश्वर लोखंडे, अजय पार्टे, सुनीता शिंदे आदी दिंडीचे प्रमुखांसह अन्य वारकरी सदस्य मोलाचे सहकार्य करीत आहेत.
.............
श्रीवर्धन शिवसेना संघटनेत फेरबदल
श्रीवर्धन (वार्ताहर) ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता श्रीवर्धन तालुक्यात शिवसेना पक्षाने संघटनात्मक स्तरावर मोठे फेरबदल करत नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. श्रीवर्धन तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे शिवसेना दक्षिण रायगड उपजिल्हाप्रमुखपदाची धुरा ॲड. अतुल चौगुले यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वातून तालुक्यातील पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्रीवर्धन हा १९९५ ते २००९ या काळात शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र गटातटाचे राजकारण आणि २००९ नंतर झालेल्या पक्षांतरामुळे संघटना कमकुवत झाली. निवडणुकांचे आरक्षण व सोडत जाहीर झाल्यानंतर नव्याने संघटन रचना उभी करण्याची गरज भासली. दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांनी दिलेल्या सूचनांनुसार या फेरबदलाची अंमलबजावणी करण्यात आली.
.....................
अनिल मालुसरे आणि दीपक उतेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव येथे शिवसेना उबाठा गटाचे पोलादपूर तालुकाप्रमुख अनिल मालुसरे आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक उतेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे पोलादपूर तालुक्यात राजकीय परिवर्तनाची ही नांदी बोलली जात आहे. हा प्रवेश प्रातिनिधिक स्वरूपात केला जात असून, पुढील काळात आणखी मोठे राजकीय धमाके करण्यात येतील, असा इशारा विरोधकांना नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांनी दिला. या वेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना नवनियुक्तिपत्र प्रदान करून राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले. अनिल मालुसरे, दीपक उतेकर यांच्यासह पोलादपूर तालुक्यातील आणि माणगाव तालुक्यातील दाखणे गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यांच्या प्रवेशामुळे भविष्यात पक्षाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत सर्वांना पक्षाची ध्येय, धोरणे आणि विचारधारा याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मार्गदर्शन करताना, आज कुणबी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आनंदाची दिवाळी साजरी करत आहे. ही परिवर्तनाची पहाट आहे आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मी स्वतः आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे, असा विश्वास व्यक्त केला. तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघात घड्याळाचा आवाज, जोरात घुमला पाहिजे, यासाठी एकदिलाने काम करून पक्षाची ताकद आणखी बळकट करू या, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
................
भाल परिसरात विद्युत पोल पडल्याने अंधार
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील भाल तुकाराम वाडी परिसरात चार-पाच विद्युत पोल पडल्याने ऐन दिवाळीत गाव अंधारात होते. याबाबत ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एमएसईबी कार्यालयावर धडक दिली. या वेळी तत्काळ संबंधित अधिकारी यांनी विद्युत पूल उभारण्याचे आदेश देत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही दिवसांपासून पेण तालुक्यात परतीचा पाऊस जोरदार वादळ वाऱ्यासह पडत आहे. त्‍यामुळे वढाव खारेपाट भागातील जीर्ण झालेले विद्युत पोल पडल्याने भाल तुकाराम वाडी गाव पूर्णतः ऐन दिवाळीत चार ते पाच दिवस अंधारात होते. याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्याकडे याची तक्रार केली असता त्यांनी तत्काळ एमएसईबी कार्यालय येथे ग्रामस्थांसह जाऊन याबाबतची विचारणा केली. तसेच परिसरातील पडलेले विद्युत पोल तत्काळ उभे करून विद्युतपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली.
..........
डॉ. देविदास बामणे ‘संघर्ष’ यांना बालगीत लेखनासाठी सन्मानपत्र प्रदान
पेण (बातमीदार) : महाराष्ट्र साहित्य साधनातर्फे दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या बालगीत स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. देविदास बामणे ‘संघर्ष’ यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या बालगीत लेखनातील सृजनशीलता व मुलांच्या भावविश्वाला साजेशी अभिव्यक्ती याबद्दल परीक्षकांनी त्यांची प्रशंसा केली. साहित्य साधना संस्थेच्या समितीने विविध लेखकांकडून प्राप्त झालेल्या बालगीतांची निवड प्रक्रिया पार पाडली. या स्पर्धेत डॉ. बामणे यांच्या बालगीताने सर्वांमध्ये विशेष ठसा उमटवत प्रथम क्रमांकाची निवड मिळवली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुलांना आनंद, संस्कार आणि कल्पनाशक्तीची देणगी देणारे लेखन सादर केल्याबद्दल त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला. डॉ. बामणे ‘संघर्ष’ हे साहित्य, शिक्षण व समाजभान या तीनही क्षेत्रांत सक्रिय आहेत. यापूर्वीही त्यांच्या काव्य, लेख, बालसाहित्य व संपादकीय कार्याला राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक संस्कार रुजवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून, महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजनही करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com